होमपेज › Konkan › डोंगर खोदाईचा ‘मिनी महाबळेश्‍वर’ला धोका

डोंगर खोदाईचा ‘मिनी महाबळेश्‍वर’ला धोका

Published On: Jul 23 2018 11:13PM | Last Updated: Jul 23 2018 10:45PMदापोली : प्रवीण शिंदे

दापोली तालुका हा पर्यटन क्षेत्र असल्याने सगळ्यांचाच ओढा दापोलीच्या दिशेने आहे. त्यामुळे दापोलीतील इंच-इंच जागेला सोन्याचा भाव आला आहे. याच दापोलीमध्ये अनेकांनी जागा खरेदी करून टोलेजंग इमारती बांधल्या आहेत. अनेक इमारती या मोठे डोंगर खोदून बांधल्या आहेत. हे चित्र दापोली तालुक्यातील ग्रामपंचायतींचे क्षेत्र आणि दापोली नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये दिसून येते.

तालुक्यात रो-हाऊस, इमारती बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात डोंगर खोदाई  केली जात आहे. दापोलीमध्ये  पावसाळ्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगर खोदाईची कामे सुरू आहेत. या डोंगर खोदाईमध्ये बांधकाम व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. दापोली ‘मिनी महाबळेश्‍वर’ म्हणून परिचित असल्याने या दापोलीमध्ये  रो हाऊस, फ्लॅट असे खरेदी करणार्‍यांची मोठी संख्या आहे. तर अशा रो-हाऊस आणि इमारतीमधील सदनिकेला मोठा दर आहे. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी कशाही प्रकारे खोदकाम करून बांधकाम व्यावसायिक अशा ठिकाणी बांधकामे उभी करीत आहेत.  

तालुक्यामध्ये पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडत आहेत. प्रचंड डोंगर खोदाईमुळे यापेक्षाही भयानक दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. एखादी दुर्घटना घडली की, संबंधित यंत्रणा कार्यतत्पर होते. मात्र, वेळीच अशा प्रकारांवर बंधने  घालण्यात येत नाहीत. त्यामुळे अशाप्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. दापोलीमध्ये नुकतीच फॅमिली माळ येथे आरसीसी भिंत कोसळली. यामध्ये जीवितहानी झाली नाही.  तालुक्यामध्ये खोदाई केलेल्या ठिकाणी आणि सदनिका असलेल्या ठिकाणी आरसीसी भिंती बांधलेली दिसत नाही. त्यामुळे अशा सदनिकेना पूर्णत्वाचा दाखला कसा मिळतो? याचेच आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. 

दापोलीतील ग्रामीण भाग आणि दापोली नगर पंचायत कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात डोंगर उत्खननाचे काम सुरू आहे. मात्र, याकडे महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अशा उत्खननाला महसूलचा वरदहस्त आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्याने जमिनीची धूप झपाट्याने होत आहे. त्यात खोदाई करून डोंगरांचे सपाटीकरण होत आहे. त्यामुळे दापोलीच्या निसर्गसौंदर्याला बाधा पोहोचत आहे. दापोलीत पर्यटन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन करून अनेकांनी दापोलीच्या निसर्ग सौंदर्यात सोयीचा आर्थिक व्यवसाय थाटला आहे. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. मिनी महाबळेश्‍वरची ओळख या खोदाईमुळे पुसली जाण्याचा धोका आहे.