Tue, Apr 23, 2019 22:30होमपेज › Konkan › गुणवत्तेला कौशल्याची जोड देत करिअर करा : भोसले

दै.पुढारी आणि चाटे शिक्षण समूह गुणगौरव सोहळा

Published On: Jun 17 2018 4:41PM | Last Updated: Jun 17 2018 4:41PMकुडाळ : काशिराम गायकवाड

कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता अफाट आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये क्षमता आहे. दहावी नंतर 11 वी व 12 वी या दोन वर्षात करिअरचा चांगला प्लॅटफॉर्म निवडून स्वत:ची क्षमता ओळखून गुणवत्तेला कौशल्याची जोड देत प्रत्येकाने करिअरच्या दिशेने योग्य वाटचाल करत आपले भवितव्य उज्ज्वल करावे असे प्रतिपादन चाटे शिक्षण समुहाचे एक्झिकेटिव्ह ऑफिसर प्रदिप भोसले यांनी कुडाळ येथील गुणगौरव समारंभप्रसंगी केले. 

दैनिक पुढारी, भास्कराचार्य प्रतिष्ठान व चाटे शिक्षण समुह यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ तालुक्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ रविवारी येथील महालक्ष्मी हॉलमध्ये पार पडला. यावेळी चाटे शिक्षण समुहाचे एक्झिकेटिव्ह ऑफिसर प्रदिप भोसले, जिल्हा व्यवस्थापक धैर्यशील माने, कुडाळच्या नगरसेविका तथा पालक प्रतिनिधी संध्या तेरसे, दै.पुढारीचे पत्रकार काशिराम गायकवाड, चाटे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स,कुडाळचे शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ.शेखर मोरे, मडव, शिक्षक विठ्ठल परब, हरिश वलादे आदींसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

भोसले यांनी मुलांना करिअरचे नवनवीन मार्ग आणि संधी या विषयी सखोलपणे मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास म्हणजेच गुणवत्ता. येथील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता भरपूर आहे. या गुणवत्तेला कौशल्याची जोड देत दहावीनंतर विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने योग्यप्रकारे वाटचाल सुरू करावी. दहावीत मिळालेल्या यशापेक्षा अकरावी व बारावी या दोन वर्षात दुप्पट यश मिळवत पुढील करिअरचा योग्य प्लॅटफॉर्म निवडावा आणि उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीने योग्यप्रकारे करिअरच्या दिशेने वाटचाल करावी. करिअरच्या असलेल्या संधी निवडून आयएएस, आयपीएस दर्जाचे अधिकारी बनावेत तसेच अन्य क्षेत्रातही नावलौकिक मिळवावा. आई-वडिलांच्या अपेक्षा व स्वतःची स्वप्ने साकार करावीत. पालकांनीही मुलांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करावे. दै.पुढारी व चाटे शिक्षण समुह आयोजित करीत असलेल्या कार्यक्रमातूनही विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन मिळत असून त्याचा प्रत्येकाने फायदा करून घ्यावा असे आवाहन भोसले यांनी यावेळी केले.  हुमरमळा येथील पुष्पसेन सावंत ज्ञानपीठ येथील चाटे शिक्षण समुहाच्या चाटे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्समध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन करिअर करावे असे आवाहनही भोसले यांनी केले.

नगरसेविका तेरसे यांनी गुणवंत विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले. आजच पुढच्या करिअरचा योग्य मार्ग निवडून भरपूर शिकून उज्ज्वल करिअर घडवा. जिल्ह्यातच आयपीएस व आयएएस दर्जाचे अधिकारी बनण्यासाठी आवडीच्या शाखेत प्रवेश घेवून भरपूर अभ्यास करत  करिअर करून प्रत्येकाने मोठे व्हा असे आवाहन करीत सौ.तेरसे यांनी दै.पुढारी व चाटे शिक्षण समूहाच्या उपक्रमाचे कौतुक केले. चाटे शिक्षण समुहाचे जिल्हा व्यवस्थापक माने यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची रूपरेषा विशद करीत करिअरचे महत्व व चाटे शिक्षण समूहाच्या शैक्षणिक उपक्रमांची माहीती दिली. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मेडल, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्रथम तीन क्रमांकांचा रोख पारितोषिक, मेडल, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विठ्ठल परब यांनी केले.