Sun, Jul 21, 2019 06:08होमपेज › Konkan › गोविंदा  आलाऽ रेऽऽ आला

गोविंदा  आलाऽ रेऽऽ आला

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 03 2018 10:30PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

आला ऽ रे ऽऽ आला गोविंदाऽ आलाऽऽ... ढाऽकुमाकुम.. ढाऽकुमाकुम...च्या गाण्यावर  ढोल-ताशांचा गजर आणि डीजेच्या तालावर थिरकणारी गोविंदांची पावले आणि सात-सात थरांची सलामी देत रत्नागिरीत दहीकाला उत्सव अमाप उत्साहात साजरा करण्यात आला.

रत्नागिरी शहरामध्ये साळवी स्टॉप येथे रत्नागिरी जिल्हा मोटर चालक-मालक संघ, मारुती मंदिर येथील दहीहंडी, एसटी स्टँड - चव्हाण हॉस्पिटलसमोर कोकण हॉकर्स मंडळ आणि मांडवी येथील शिवसेना पुरस्कृत मानाच्या दहीहंड्यांना गोविंदा पथकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजापूर, लांजा, देवरूखसह रत्नागिरी तालुक्यांतील ग्रामीण भागामधून गोविंदा पथके दाखल झाली होती. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मानाच्या दहीहंड्या फोडण्यात आल्या नव्हत्या. रात्री उशिरापर्यंत दहीहंड्या फोडण्याची लगबग सुरू होती. जिल्ह्यात सर्वत्र काहीशी सारखीच परिस्थिती होती.

रत्नागिरी शहरात सायंकाळी साडेतीन-चार वाजण्याच्या सुमारात विठ्ठल मंदिर व राधाकृष्ण मंदिर येथील दहीहंडी फोडून उत्सवाला सुरुवात झाली. रामआळी, मारुतीआळी, मुरळीधर मंदिर, टिळकआळी, तेलीआळी भाजीमार्केट परिसरातील दहीहंड्या स्थानिक पथकांनी फोडल्या. पेठकिल्ला येथील श्री सांबच्या पालखीची वाजतगाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी श्री सांब पालखीचे राजिवडा विश्‍वेश्‍वर मंदिरात भाविकांनी स्वागत केले.

यावर्षी जिल्ह्यात 234 सार्वजनिक तर 3040 खासगी दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत  सार्वजनिक 7 तर खासगी 90, रत्नागिरी ग्रामीणमध्ये सार्वजनिक 94 तर खासगी 86, जयगडमध्ये सार्वजनिक 16 तर 167 खासगी दहिहंड्या होत्या. राजापूरमध्ये 42 सार्वजनिक तर 72 खासगी, नाटे येथे 1 सार्वजनिक तर 130 खासगी लांजा 37 सार्वजनिक तर 75 खासगी, देवरुखात  8 सार्वजनिक तर 50 खासगी, संगमेश्‍वरमध्ये 9 सार्वजनिक तर 124 खासगी, सावर्डे येथे 4 सार्वजनिक तर 145 खासगी, चिपळूणमध्ये 13 सार्वजनिक तर 290 खासगी, अलोरेत 5 सार्वजनिक तर  35 खासगी, गुहागर 10 सार्वजनिक तर 220 खासगी, खेडमध्ये 24 सार्वजनिक व 450 खासगी, दापोलीत 36 सार्वजनिक तर 327  खासगी, मंडणगड 6 सार्वजनिक व 250 खासगी, पूर्णगड 15 सार्वजनिक तसेच 30 खासगी, दाभोळमध्ये 4 सार्वजनिक व 257 खासगी अशा एकूण 234 सार्वजनिक आणि 3040 खासगी दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत या हंड्यांना सलामी देण्याचा माहोल होता.