Thu, Apr 25, 2019 21:58होमपेज › Konkan › परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ

परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ

Published On: Apr 21 2018 1:00AM | Last Updated: Apr 20 2018 11:22PMरत्नागिरी : शहर वार्ताहर 

माध्यमिक शाळेतील डीएड पदवीधर शिक्षकांना न्याय मिळावा,  या हेतूने काढलेल्या परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या परिपत्रकाची अंमलबजावणी माध्यमिक शाळांचे संचालक टाळाटाळ करीत असल्याचे पुढे आले आहे.

महाराष्ट्रातील माध्यमिक शाळांत कार्यरत असणार्‍या व पदवी प्राप्त केलेल्या डीएड शिक्षकांना न्याय मिळावा, त्यांना पदोन्नती मिळावी, यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेवून 13 ऑक्टोबर 2016 रोजी आदेश काढून माध्यमिक शाळेतील डीएड पदवीधारक शिक्षकांना पदोन्नती द्यावी, तसेच त्यांचा प्रथम नियुक्‍ती दिनांक हाच सेवाज्येष्ठतेसाठी परिपूर्ण आहे, हे स्पष्ट केले आहे व नियुक्‍तीच्या दिनांकास त्याची सेवाज्येष्ठता निश्‍चित करावी, अशा प्रकारचे स्पष्ट आदेश असूनही अद्याप रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याच माध्यमिक शाळेत याची अंमलबजावणी झालेली नाही.

शासन परिपत्रक अतिशय सुुस्पष्ट व नि:संदिग्ध असतानाही काही स्वार्थी संघटना, पदाधिकारी व आमदार यांनी याला हरकत घेऊन तो ‘जीआर’ संदिग्ध आहे, अशी आरोळी ठोकून तो जास्तीत जास्त लांबणीवर कसा टाकता येईल, असा कुटील डाव आखला आहे. या संघटना अधिकारी व शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या ‘जीआर’ विषयी डीएड, बीएड शिक्षकांत कोणताच वाद नसताना उगाचच त्यांच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात प्रथम ‘जीआर’ 13 ऑक्टोबर 2016 रोजी काढला, पण तो संदिग्ध आहे. आम्हाला समजत नाही. नेमके काय करायचे असे अनेक प्रश्‍न शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या अनेक ज्येष्ठ लोकांनी जाणीवपूर्वक निर्माण करून अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. यावर स्पष्टीकरणात्मक ‘जीआर’ अप्पर सचिव सं.द.माने, यांनी 14 नोव्हेंबर 2017 रोजी काढून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही नैराश्येपोटी या परिपत्रकाचा स्वीकार करायला संचालक तयार नाहीत.

अप्पर सचिवांनी स्पष्टीकरण देताना नि:संदिग्धपणे  काही मुद्दे मांडले आहेत. पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित शिक्षकाचा पदवीधर शिक्षकाच्या यादीमध्ये समावेश होईल. या यादीतील त्याचा ज्येष्ठतेचा दिनांक हा अखंड सेवेतील शिक्षक पदावरील प्रथम नियुक्‍तीचा जो दिनांक असेल तोच दिनांक राहील. शिक्षक संवर्गात प्रथम नियुक्‍ती दिनांक व अखंड सेवा विचारात घेऊन तयार करण्यात आलेली सामायिक ज्येष्ठतासूची पदोन्नतीकरिता विचारात घेण्यात यावी व पदोन्नतीच्या पदाकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अनुभवाच्या अटीसह पदोन्नतीच्या वेळेस संबंधित शिक्षक धारण करीत असेल तर त्याच शिक्षकाला पदोन्नती मिळेल. पदोन्नतीकरिता विचारात घ्यावयाची सामायिक ज्येष्ठतासूची ही उच्च प्राथमिक स्तराबरोबरच माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक स्तराकरिताही लागू करण्यात येत आहे.

शासनाने घेतलेला हा धोरणात्मक निर्णय असून हा निर्णय म्हणजे शिक्षकांमध्ये वाद किंवा भांडणे लावण्यासाठी नसून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार पात्रताधारक शिक्षकांना योग्य न्याय, हक्‍क मिळावा यासाठी आहे. पण याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे पात्रताधारक शिक्षकांमध्ये अधिकारी, संघटना, पदाधिकारी, आमदार यांच्याविषयी तीव्र असंतोष आहे.

Tags : D.Ed graduate of secondary schools Teacher deprived from the claim