Sat, Aug 17, 2019 16:25होमपेज › Konkan › कोकणात क्रुझ पर्यटन बहरणार

कोकणात क्रुझ पर्यटन बहरणार

Published On: Dec 01 2017 10:39AM | Last Updated: Dec 01 2017 10:38AM

बुकमार्क करा

रायगड : विशेष प्रतिनिधी

कोकणात ७२ जेटी विकसित करुन ७०० किलोमीटरचा जलप्रवास २५ डिसेंबरपासून सुरु होत असून रायगड रत्नागिरी सिंधूदुर्ग या जिल्ह्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. तसेच क्रुझ पर्यटनालाही या निमित्ताने चालना दिली जाणार आहे.

मुंबई हे महाराष्ट्रासह देशाचे क्रूझ पर्यटनाचे (समुद्रपर्यटन) केंद्र ठरत असून जगातील नामांकीत अशा कोस्टा क्रूझ कंपनीने चालू सिजनमधल्या पहिल्या क्रूझची सुरुवात मुंबईहून केली. मुंबई-कोचीन-मालदीव या मार्गाने जाणार्‍या क्रूझचा शुभारंभ आणि स्वागत राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याहस्ते आज मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे करण्यात आले. अवघ्या २९ हजार ८०० रुपयात मुंबई ते कोचिन दरम्यान डोमिस्टिक क्रूझचा आनंद मिळवून देणार्‍या या क्रूझची पहिली फेरी येत्या रविवारी निघणार आहे. चालू सिझनमध्ये मार्च २०१८ पर्यंत मुंबईतून दर पंधरा दिवसांनी एक क्रूझ निघणार आहे.
पर्यटन मंत्री रावल यावेळी म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाने क्रूझ पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. 

त्यादृष्टीनेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोस्टा क्रूझ कंपनीसोबत समन्वय केला आहे. या कंपनीच्या पहिल्या डोमेस्टिक क्रूझचा आज शुभारंभ करण्यात येत आहे.

क्रूझमधून भारतात मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक येणार असून या पर्यटनातून भारतात दरवर्षी साधारण 35 हजार कोटी रुपयांचे परकीय चलन येण्याचा अंदाज आहे. मुंबई हे क्रूझींगसाठी गृहबंदर ठरत असून भविष्यात देशातील बहुतांश क्रूझ मुंबई बंदरातून रवाना होतील. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राच्या पर्यटन विकास, रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात
चालना मिळेल, असे ते म्हणाले. 

सप्ततारांकीत सुविधांनी युक्त केबिन्स, पर्यटक क्षमता आज सुरु करण्यात आलेले कोस्टा निओ क्लासिका क्रूझ हे मुंबई - कोचिन - मालदिव दरम्यान प्रवास करणार आहे. मुंबई ते कोचिन दरम्यान क्रूझ प्रवास फक्त 29 हजार 800रुपयांचा असून त्यात 4 दिवस आणि 3 रात्री क्रूझचा आनंद घेता येणार आहे. तसेच मालदिवपर्यंतच्या 8दिवस आणि 7 रात्रीच्या क्रूझचा दर हा 45 हजार रुपये इतका आहे. मुंबईतून दर पंधरवड्यात रविवारी हे क्रूझ निघणार असून चालू सीझनमध्ये ही पर्यटन प्रवासी सेवा मार्च 2018 पर्यंत असेल. कोस्टा निओ क्लासिका या जहाजात 654 केबिन्स असून 1 हजार 700 पर्यटक प्रवास करतील.


मुंबई - गोवा जलप्रवास सेवा 25 डिसेंबरपर्यंत जलप्रवासाला चालना देण्याचे केंद्र आणि राज्य शासनाचे धोरण आहे. त्यादृष्टीने मुंबई ते गोवा दरम्यान ठिकठिकाणी 72 जेट्टी विकसीत करण्यात येत आहेत. या जेट्टींच्या निर्मितीनंतर 700 किमी समुद्र किनार्‍यावरुन कोकणात ठिकठिकाणी थांबे घेऊन गोव्यापर्यंत प्रवास करणे शक्य होऊ शकेल. मुंबई ते गोवा दरम्यान प्रस्तावित असलेला जलप्रवास तथा क्रूझ साधारण 25 डिसेंबरपर्यंत सुरु होईल, अशी माहितीही पर्यटन मंत्री रावल यांनी दिली.