Tue, Jul 23, 2019 16:42होमपेज › Konkan › गायीच्या नव्या जातीचे संशोधन

गायीच्या नव्या जातीचे संशोधन

Published On: Dec 11 2017 1:30AM | Last Updated: Dec 10 2017 9:24PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : वार्ताहर

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ व राष्ट्रीय पशु अनुवंशिक संसाधन ब्युरो, कर्नाल, हरियाणा यांच्या संयुक्‍त विद्यमाने कोकणासाठी गायीच्या नवीन जातीचे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनात गायींचे स्वाभाविक गुणवर्णन करून नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

या संशोधनाच्या निष्कर्षाचे सादरीकरण कार्यक्रम कुलगुरू डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संचालक, विभागप्रमुख, विद्यार्थी आणि पशुपालक यांच्यासमोर करण्यात आले आहे. या प्रयोगाचे सादरीकरण डॉ. पी. के. सिंग, प्रमुख शास्त्रज्ञ एन.बी.ए.जी.आर. कर्नाल यांनी केले. कोकणातील गायींचे संशोधनातून गुणवर्णनानुसार काळा, तपकिरी, पांढरा आणि मिश्र रंगा असे चार प्रकार आढळले आहेत.

या गायींची जनुके महाराष्ट्रातील गायींच्या इतर जातींपेक्षा भिन्‍न आहेत. तसेच तिच्यात कोकणातील उष्ण, दमट आणि अति पावसाचे डोंगराळ भागात चराई करून पोषण आणि उत्पादन करण्याची अधिक क्षमता आहे. या गायीची नवीन जात म्हणून नोंदणी करावी, असे पशुपालकांनी सुचवले आहे. 

याप्रसंगी उपस्थित पशुपालकांनी आणि शास्त्रज्ञांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांचे डॉ. पी. के. सिंग यांनी समाधान केले. कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी पशुसंवर्धन, दुग्धशास्त्र विभागातील शास्त्रज्ञांचे आणि एनबीएजीआरच्या शास्त्रज्ञांचे गायींच्या नवीन जात संशोधनासाठी अभिनंदन केले.