Tue, May 21, 2019 04:06होमपेज › Konkan › सुधार समितीने घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

सुधार समितीने घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 20 2017 10:09PM

बुकमार्क करा

चिपळूण : शहर वार्ताहर

चिपळूण नगरपरिषद व मुख्याधिकारी यांच्या कारभाराविरोधात झालेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण करा व वादग्रस्त मुख्याधिकारी यांची त्वरित बदली करा, अशी मागणी चिपळूण सुधार समितीच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना केली आहे.  यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकार्‍यांनी, येत्या पंधरा दिवसांत योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन समितीला दिले.

चिपळूण न.प.चे मुख्याधिकारी डॉ. पंकज गोकुळ पाटील तसेच चिपळूण न.प.चा गैरकारभार या विरोधात गेल्या तीन महिन्यांपासून झालेल्या तक्रारींची दखल जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने घ्यावी, तसेच या सर्व तक्रारींचे निराकरण करावे, या मागणीसाठी चिपळूण शहर सुधार समितीने मंगळवार दि. 19 रोजी दुपारी 4 वा. जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांची भेट घेतली.

यावेळी समितीच्या माध्यमातून माजी नगरसेवक व समितीचे प्रमुख शिरीष काटकर, माजी उपनगराध्यक्ष सेनेचे क्षेत्रप्रमुख बाळा कदम, माजी नगरसेवक व सेनेचे शहरप्रमुख राजू देवळेकर, अपक्ष नगरसेवक अविनाश केळसकर, इकलाक खान आदी पाचजणांच्या समितीने जिल्हाधिकारी यांच्यासमवेत या विषयी पाऊण तास चर्चा केली. चिपळुणातील जनता कार्यवाहीच्या प्रतिक्षेत आहे, तर मुख्याधिकारी यांच्या बदलीची वारंवार मागणी होत आहे. चौकशीदरम्यान संबंधित तक्रारदारांनाही सामावून घ्यावे. समक्ष चौकशी व्हावी. दिलेल्या पुराव्यांची पडताळणी करावी. त्यापूर्वी न.प.च्या सभेत मुख्याधिकारी यांच्याविरोधात झालेल्या ठरावाची गेले दोन महिने रखडलेली अंमलबजावणी तातडीने करावी, आदी विषयांचे व तक्रारींचे निराकरण करावे, अशी मागणी  समितीने चर्चेदरम्यान केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी येत्या पंधरा दिवसांत संबंधित सर्व तक्रारींचे निराकरण करून मुख्याधिकार्‍यांवर योग्य कारवाई करू, असे सांगितले.

चौकशी समितीची माहिती नाही

सुधार समितीने चर्चेदरम्यान, येत्या दहा दिवसांत मुख्याधिकार्‍यांवर कारवाई करण्याच्या मागणीबाबत जिल्हाधिकारी यांनी सर्व तक्रारींसंदर्भात चौकशी समिती नेमली आहे. समितीच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे पंधरा दिवसांची प्रतीक्षा करा, असे सांगितले. चौकशी समितीबाबत अपक्ष नगरसेवक केळसकर यांनी स्पष्ट केले की, ही समिती चिपळूण न.प.त कधी आली याची साधी माहितीही तक्रारदारांना दिलेली नाही. सायंकाळी उशिराने समिती आली व चौकशी करून निघून गेल्याचे तक्रारदारांना नंतर समजले, असे केळसकर यांनी सांगितले.