Wed, May 22, 2019 06:16होमपेज › Konkan › गुहागरात नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच

गुहागरात नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच

Published On: Apr 05 2018 11:19PM | Last Updated: Apr 05 2018 10:42PMगुहागर : प्रतिनिधी

गुहागर नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शहर विकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. नगराध्यक्ष पदासाठी देखील या तीन पक्षांमध्येच स्पर्धा असून शहर विकास आघाडीचे उमेदवार राजेश बेंडल, राष्ट्रवादीचे दीपक कनगुटकर व भाजपचे उमेदवार रवींद्र बागकर यांच्या चुरस निर्माण झाली आहे.

अवघी पाच हजार मतदारसंख्या असलेल्या गुहागर न. पं. निवडणुकीत 17 नगरसेवक निवडले जाणार आहेत तर नगराध्यक्ष जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी नगराध्यक्ष पदावर लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादी सर्व शक्‍तीनिशी नगराध्यक्षपदासाठी ताकद लावत असून त्याला शहर विकास आघाडीने कडवे आव्हान उभे केले आहे. गुहागरमधील निवडणुकीचा सामाजिकद‍ृष्ट्या विचार केल्यास नगराध्यक्ष पदासाठी येथील भंडारी समाजाचे कनगुटकर व बागकर असे दोन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. कुणबी समाजाच्या वतीने शहर विकास आघाडीकडून बेंडल हे रिंगणात आहेत.

सद्य:स्थितीत बेंडल यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. या तिन्ही उमेदवारांच्या कार्याचा विचार केल्यास  बेंडल यांचे पारडे जड आहे. शहर विकास आघाडीने या निवडणुकीसाठी अडीच ते तीन हजार मतांचे ध्येय ठेवले आहे.  राजेश बेंडल यांनी याआधी पाच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना गुहागर पंचायत समितीचे सभापती व उपसभापती अशी महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. त्यामुळे त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. या शिवाय त्यांचा अनुभव मोठा असून ते गुहागरचे माजी आमदार कै. रामभाऊ बेंडल यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. गुहागरमध्ये कुणबी समाजाचे वर्चस्व आहे. शिवाय शिवसेनेने आघाडीला पाठिंबा दिला आहे. 

सत्ताधारी राष्ट्रवादीतर्फे दीपक कनगुटकर नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत. गुहागर न. पं. मध्ये याआधी त्यांनी पाच वर्षे नगरसेवक पद भूषविले आहे. तसेच बांधकाम सभापती म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. येथील आ. भास्कर जाधव यांचा त्यांना भक्‍कम पाठिंबा असून त्यांनीच ही उमेदवारी दिली आहे. शिवाय येथील भंडारी समाजाचे नेतृत्व असल्याने समाजाचा त्यांना पाठिंबा आहे.  भारतीय जनता पक्षाच्या वतीने भंडारी समाजातील उमेदवार रिंगणात उतरविण्यात आला आहे. रवींद्र बागकर यांचा लोकसंपर्क दांडगा असून गुहागरमध्ये भाजपने नगराध्यक्ष पदासाठी हा चेहरा दिला आहे. गुहागरमध्ये भाजपची ताकद लक्षणीय आहे. त्याचा फायदा बागकर घेणार आहे. माजी आमदार विनय नातू,  जिल्हाध्यक्ष बाळ माने यांचा झंझावाती प्रचार दौरा झाला. त्यामुळे बागकर यांना फायदा होणार आहे. त्यामुळे नगराध्यपदासाठी चुरस होणार आहे. दुसर्‍या बाजूला आ. जाधव शहर विकास आघाडीच्या मतांना किती सुरुंग लावतात या वरच नगराध्यक्ष पदाचा दावेदार ठरणार आहे.

Tags : Corporation Election, Election Candidate, Guhagar, Kokan