Wed, Sep 19, 2018 16:22होमपेज › Konkan › पोलिस-आंदोलनकर्त्यांत झटापट

पोलिस-आंदोलनकर्त्यांत झटापट

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 10:50PMओरोस : प्रतिनिधी

कसाल-ओसरगाव नदी पुलानजीक हायवेवर टायर पेटवून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी आलेल्या पोलिसांपैकी चालक विठ्ठल कोयंडे यांनी मराठा जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या प्रकारावरून आंदोलक संतप्त झाले आणि त्यांच्यात व पोलिसांत जोरदार झटापट झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी जोरदार लाठीचार्ज केला. यात 5 पोलिस कर्मचारी आणि आंदोलक कार्यकर्ते बाबा सावंत, बाळा सूर्यवंशी यांच्यासह 7 जण जखमी झाले. या घटनेनंतर पोलिसांनी बाबा सावंत, बाळा सूर्यवंशी यांना ताब्यात घेतल्यानंतर मराठा समाजबांधवांसह आ. वैभव नाईक व आ. नितेश राणे यांनी ओरोस पोलिस स्थानकात ठाण मांडून मराठा समाजबांधवांना अपशब्द वापरणारे पोलिस विठ्ठल कोयंडे हे जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत तेथून न हटण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर त्या पोलिसाला माफी मागावी लागली. यातील जखमी पोलिसांना जिल्हा रुग्णालयात तर जखमी आंदोलकांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

यावेळी मराठा बांधवांनी ओरोस पोलिस स्थानकातच ठिय्या मांडला. कसाल पुलानजीकच्या घटनेत पोलिस हवालदार श्री. तारी, श्री. शेलटकर, श्री. आयनोली, विठ्ठल कोयंडे, श्रीमती सावंत आदीजण जखमी झाले. पोलिस जखमी झाल्याने आंदोलकांवर गुन्हा दाखल होणारच असा पवित्रा जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपअधीक्षक सचिन पांडकर यांनी घेतला. त्यांनी सरकारी कामात अडथळा आणला आहे त्यामुळे गुन्हे दाखल होणारच या भूमिकेवर पोलिस ठाम होते. यावेळी आ. वैभव नाईक व आ. नितेश राणे यांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नका, पोलिस श्री. कोयंडे यांच्यामुळेच वातावरण चिघळले त्यामुळे त्यांनीच माफी मागायला हवी अशी भूमिका घेतली. शेवटी बंद खोलीत पोलिस कोयंडे यांनी दोन्ही आमदारांच्या समक्ष माफी मागितली. मात्र सायंकाळी बाबा सावंत, बाळा सूर्यवंशी यांच्यासहीत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद हवालदार शेलटकर यांनी दिली. 

या आंदोलनादरम्यान सौ. जान्हवी सावंत, बाबा आंगणे, प्रभाकर सावंत, भाई सावंत, योगेश तावडे, परशुराम परब, हर्षद गावडे आदींसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.