होमपेज › Konkan › आंबोलीतील बंधार्‍यावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद रंगणार 

आंबोलीतील बंधार्‍यावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद रंगणार 

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 27 2018 11:12PMसावंतवाडी : हरिश्‍चंद्र पवार 

जमिनीची धूप थांबविण्याच्या दृष्टीने वनविभागाने मुख्य धबधब्यांवरुन कोसळणारे पाणी अडविण्यासाठी सिमेंट काँक्रिटचे बंधारे उभारल्यामुळे ऐन वर्षा पर्यटनात धबधबे कोरडे पडल्याने धबधब्यांवरुन वाद सुरू झाला आहे. हे बंधारे हटविण्याची मागणी स्थानिक व्यावसायिकांबरोबर भाजपा प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी केली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे नेते पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बारमाही धबधबे वाहण्यासाठी हे बंधारे आवश्यक असल्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे या मुद्यावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. 

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार बारमाही धबधबे सुरू राहण्यासाठी वनविभागाने आंबोली मुख्य धबधब्यात सोडण्यात येणार्‍या पाण्याचा प्रवाह अडविणारे 7  सिमेंट बंधारे बांधले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही धबधब्यामध्ये धो धो ओसंडणारा प्रवाह कमी झाला आहे. हे बंधारे तत्काळ तोडावेत, अशी मागणी स्थानिकांबरोबर भारतीय जनता पक्षाचे राजन तेली व शिवसेनेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. एकूण 7 धबधब्यांचे सर्किट करुन बारमाही धबधबे सुरु करुन पालकमंत्री दीपक केसरकर यांना आंबोलीत बारमाही पर्यटन सुरु करण्याचा मनोदय व्यक्‍त केला आहे. सध्या धबधब्याला पाणीच नसल्यामुळे पर्यटकांनी आंबोलीकडे पाठ फिरविली आहे. परिणामी त्याचा परिणाम स्थानिक व्यावसायिकांवर झाल्याचे दिसत आहे.

पहिल्या टप्प्यात चार धबधब्यांचे सर्किट जोडले जाईल आणि पावसाळ्यानंतर तीन धबधब्यांचे सर्किट असे मिळून एकूण 7 धबधब्यांचे सर्किट केल्याने सद्यस्थितीमध्ये असलेल्या मोठ्या धबधब्यांप्रमाणे 7 धबधबे बारमाही धो धो कोसळणार आहेत. या नव्याने सुरु होणार्‍या धबधब्यांपर्यंत पर्यटकांना जाण्यासाठी रस्ता नसला तरी हे रस्ते क्रिएट करीत असताना धबधब्यांचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेऊन नॅचरल ट्रेक्सचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे आणि धबधब्याकडे  जाणार्‍या पर्यटकाला नैसर्गिक एकांत मिळणार असल्याची संकल्पना पालकमंत्री दीपक केसरकर यांची आहे.  

ब्रिटिशकालीन असलेल्या धबधब्यांवर वनविभाने उभारलेले कॉँक्रिटचे बंधारे हे चौकुळ येथे पाण्याचा प्रवाह धबधब्यांकडे येतो त्या ठिकाणी उभारले आहेत. धबधब्यांतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने धबधब्यांवर  आंघोळीसाठी येणार्‍या पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे. दर दिवसाला किमान 400 पर्यटक आंबोली मुख्य धबधब्याला भेट देऊन वर्षा पर्यटनाचा आंनद लुटतात. परंतु, यावेळेस ती संख्या निम्म्यावर पोहोचली आहे. आंबोली धबधब्यांवरील बंधारे हे वन व्यवस्थापन समिती चौकुळ यांच्यामार्फत वनविभागाने बांधले असून ते पाणी अडविण्यासाठी नाहीत तर जमिनीची धूप थांबविण्यासाठी आहेत.

हे बंधारे पहिल्या पावसातच गाळाने भरले आहेत. त्यामुळे पाणी अडविण्याचा प्रश्‍नच नाही. खर तर यावर्षी किनारपट्टी व तळकोकणात जोरदार पाऊस पडला. पण धबधब्यांवरील पाणलोट क्षेत्र चौकुळ नेनेवाडी येथे अजून पडलेला नव्हता. गेले दोन दिवस मात्र जोराचा पाऊस सुरू असून धबधबे प्रवाहीत होण्यासाठी लागणारी उमळ (पाझर) आता पडलेली आहे. त्यामुळे चार दिवसात धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळेल.त्यामुळे बंधारे तोडू नका तर चार दिवस वाट पहा, अशी विनंती गुलाबराव गावडे यांनी केली आहे.