Sat, Apr 20, 2019 15:52होमपेज › Konkan › राज्यातील महिला अत्याचाराबाबत सजग

राज्यातील महिला अत्याचाराबाबत सजग

Published On: Mar 08 2018 10:35PM | Last Updated: Mar 08 2018 10:35PMरत्नागिरी : प्रतिनिधी

प्रगत राष्ट्रांमध्ये महिलांना अधिकार नाहीत पण भारतात महिलांना शैक्षणिक, आरोग्य आणि सामाजिक अधिकार आहेत. देशात महिलांवर राजरोस अत्याचार होत आहेत. आपल्यावरील अत्याचाराची दबाव आणि भीतीपोटी त्या कोठेही वाच्यता करत नाही. पण राज्यातील महिला अत्याचाराबाबत सजग आहेत. अत्याचाराची तक्रार ते पोलिसांकडे करतात. ‘उमेद’मुळे महिला घराबाहेर पडू लागल्या असल्याचे प्रतिपादन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केली.

दि. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार, आरोग्यविषयक विविध योजनामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या आशा कार्यकर्ती व आशा गटप्रवर्तक तसेच उत्कृष्ट कार्य केलेल्या अंगणवाडी कार्यकर्ती यांचा सत्कार गुरुवारी साळवी स्टॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा स्नेहा सावंत होत्या.

महिला व बालकल्याण विभाग, जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद आरोग्य विभाग अणि मातोश्री स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलानाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. 

यावेळी कोकण परिक्षेत्र नवी मुंबईचे पोलिस अधीक्षक सुरेश मेंगडे, पुण्यातील अंगणवाडी सेविका शारदा मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, रघुनाथ बामणे, उदय बने, मेघना पाष्टे, शिल्पा सुर्वे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, श्रीकांत कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

भारतातील पहिल्या डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार योजना जाहीर करण्यात आली होती. त्याअनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील कुंबळे, ता. चिपळूण या प्राथमिक आरोग्य केंदाने प्रथम क्रमांकाचा मान पटकावून 25 हजार रुपये पटकावले. द्वितीय क्रमांक दादर चिपळूणला 15 हजार रू.तसेच कडवई संगमेश्‍वर व चांदेराई रत्नागिरी या प्राथमिक आरोग्य केंद्रांना तृतीय क्रमांकाचे विभागून 10 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. तसेच उपजिल्हा रुग्णालय दापोली यांना सलग तिसर्‍यांदा 50 हजार रू. प्रथम क्रमांकाचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. 
यावेळी महिला अत्याचार, प्रतीबंधात्मक कायद्यातील तरतुदी याबाबत कोकण परिक्षेत्र नवी मुंबईचे पोलिस अधीक्षक सुरेश मेंगडे व महिला सक्षमीकरण व सबलीकरण बाबत पुणे येथील अंगणवाडी सेविका शारदा मुंडे यांनी मार्गदर्शन केले.