Sun, Jul 21, 2019 10:24होमपेज › Konkan › चिपळुणात काँग्रेस मेळाव्याने राजकारण तापणार 

चिपळुणात काँग्रेस मेळाव्याने राजकारण तापणार 

Published On: May 13 2018 2:15AM | Last Updated: May 12 2018 10:52PMचिपळूण : खास प्रतिनिधी

काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांच्या पुढाकाराने सोमवारी काँग्रेसचा जिल्हा मेळावा होतो आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यावर कुरघोडी करीत या मेळाव्याच्या एक दिवस आधी म्हणजे रविवारी चिपळुणात एका कार्यक्रमाचेआयोजन केले आहे. त्यामुळे आता येथील राजकारण तापणार आहे. 

आगामी निवडणुकींसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडीचे संकेत दिले आहेत. आता होणार्‍या विधान परिषद निवडणुकीसाठीही आघाडी झाली आहे. सध्या राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी म्हणून आ. भास्कर जाधव यांच्याकडे जबाबदारी आहे तर शेखर निकम यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर बाबाजी जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी घेतली आहे. दुसर्‍या बाजूला काँग्रेसने रमेश कदम याना जिल्हाध्यक्षपद दिले आहे. आघाडी होणार असल्याने आता हे नेते भविष्यात एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. त्यात कदम हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मुशीतूनच आल्याने त्यांना या पक्षाची विचारप्रणाली अवगत आहे. मूळ काँग्रेसमधूनच त्यांनी स्थापनेनंतरच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता आणि आमदारकी भूषविली होती. त्यामुळे काँग्रेस विचारधारा त्याना परिचित आहे. आता जिल्ह्याची जबाबदारी आल्याने त्यांचा संघटना बांधताना कस लागणार आहे. त्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव हे त्यांचे एक काळचे सहकारी असल्याने आघाडी नांदेल, अशी आशा आहे. 

दुसर्‍या बाजूला माजी आ. कदम आणि राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी आ. भास्कर जाधव यांच्यातील सख्य सर्वांनाच परिचित आहे. त्यामुळे त्यांच्यातील वादाचा आघाडीच्या राजकारणावर काय परिणाम होणार, हे  येणारा काळच ठरविणार आहे.

चिपळूण न. प. मध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानंतर प्रथमच पक्षाचा शहरात कार्यक्रम होत आहे. त्याला नूतन जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, प्रभारी आ. भास्कर जाधव, माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम आदी उपस्थित रहाणार आहेत. रमेश कदम यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आधी भाजप आणि त्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांना शहरात मानणारा मोठा वर्ग आहे. 25 वर्षे त्यांनी न. प. मध्ये सत्ता भोगली आहे. त्यामुळे हा मेळावा शहरातील कोण कोण कदम यांच्याबरोबर जाणार हे दाखविणारा ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते रविवारच्या शहराच्या मेळाव्याला हजर असणार नाहीत ते सोमवारी होणार्‍या काँग्रेसच्या मेळाव्यात दिसतील. त्यामुळे शहराचे राजकीय समीकरण बदलणारे हे मेळावे ठरणार आहेत. 

राष्ट्रवादीने कदम यांची शहरात ताकद आहे हे लक्षात घेऊन प्रथम फक्‍त शहराचा मेळावा घेतला आहे. तर काँग्रेसने प्रदीर्घ कालावधीनंतर नव्या जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांना मेळाव्यातून हाक दिली आहे. त्यामुळे हे दोन्ही मेळावे आघाडीच्या जिल्ह्यातील वाटचालीबाबत दिशा देणारे ठरणार आहेत.

जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करता आ. भास्कर जाधव आणि माजी आ. रमेश कदम यांच्यातील वाद राज्यस्तरापर्यंत गाजला. आधी सेना आणि राष्ट्रवादी असा सामना रंगला. मध्यंतरी आ. जाधव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर कदम-जाधव यांच्यात पक्षांतर्गत कलगीतुरा झाला.आता तिसर्‍या अंकात मित्रपक्षात हेच दोन नेते असताना मित्रत्वाचे नाते जोडून आघाडीचा धर्म पाळणार की, जिल्ह्यात आघाडीत बिघाडी होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.