Tue, Jul 16, 2019 01:35होमपेज › Konkan › ‘नाणार’विरोधात काँग्रेसचा एल्गार

‘नाणार’विरोधात काँग्रेसचा एल्गार

Published On: May 01 2018 1:16AM | Last Updated: Apr 30 2018 10:38PMराजापूर : प्रतिनिधी

नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाविरुद्ध प्राणपणाने लढणार्‍या स्थानिक प्रकल्पग्रस्तांना भक्‍कम पाठिंबा देत रिफायनरीविरोधात रणशिंग फुंकण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण बुधवारी (दि. 2 मे) नाणार दौर्‍यावर येत असून त्यांची सागवे येथे सभा होणार आहे.स्थानिकांचा मोठा विरोध असताना शासनाने प्रकल्प लादण्याचा केलेला प्रयत्न याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कशा प्रकारे शासनाचा समाचार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सूचनेवरून पक्षाचे एक शिष्टमंडळ दोन दिवसांच्या दौर्‍यावर येऊन गेले होते. 

प्रकल्प परिसराचा दौरा केल्यानंतर त्याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना सादर करण्यात आला होता. शनिवारी तो अहवाल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्लीत सादर करण्यात आला आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे  बुधवारी (दि. 2 मे) नाणारच्या दौर्‍यावर येत आहेत. प्रकल्पाला विरोध म्हणून सागवे येथे सकाळी 11 वाजता त्यांची सभा होणार आहे . त्यांच्यासमवेत पक्षाचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश व अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.रिफायनरी  प्रकल्पाला स्थानिकांचा जबरदस्त विरोध असतानादेखील शासनाकडून  तो प्रकल्प लादला जात असून शासनाच्या भूमिकेसह  सेना, भाजपत प्रकल्पावरुन चाललेली सुंदोपसुंदी यावर काँग्रेसकडून कसा समाचार घेतला जातो, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

‘जैतापूर’बाबतची भूमिका स्पष्ट करणार का?

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे एक शिष्टमंडळ नाणारच्या दौर्‍यावर आले होते. त्यावेळी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी जनतेने त्या शिष्टमंडळाला ‘जैतापूर’ प्रकल्पग्रस्त गावांना भेट देण्याचे आवतन लेखी स्वरूपात दिले होते. मात्र, त्यावेळी खा. हुसेन दलवाई यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या शिष्टमंडळाने भेट दिलीच नाही. त्यावेळी जैतापूरचा विषय वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार असल्याचे खा. दलवाई यांनी सांगितले होते. तसा तो विषय जर पोहोचवला गेला असेल, तर प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण काय बोलणार, याकडे लक्ष लागले आहे.


जैतापूर प्रकल्प घातक उद्योगांची जननी : बोरकर

रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

कोकणात येऊ घातलेल्या सर्व प्रदूषणकारी उद्योगांना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पातून वीजपुरवठा करण्याचे नियोजन आहे. हा विनाशकारी ऊर्जा प्रकल्प इतर घातक उद्योगांची जननी आहे. त्यामुळे नाणार रिफायनरीला विरोध करतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अणुऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलनाला पाठिंबा देऊन मुळावरच घाव घालावा, अशी मागणी मच्छीमारांचे नेते अमजद बोरकर व अ‍ॅड. मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे जे शेती, फळबागा, मासेमारीवर दुष्परिणाम होणार आहेत. तेच दुष्परिणाम नाणार रिफायनरीमुळे होणार आहेत. राहुल गांधी यांनी नाणार प्रकल्प विरोधी संघर्ष समितीला नाणार भेटीचे आश्‍वासन दिले आहे. त्या भेटीवेळी गांधी यांनी अणुऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलनावेळी पोलिसांच्या गोळीबारात शहीद झालेल्या तबरेज सायेकरच्या कुटुंबाची भेट घ्यावी. त्याचवेळी त्यांनी अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवावा, अशी भावनाही बोरकर यांनी यावेळी व्यक्‍त केली.सुमारे 7 वर्षांपूर्वी साखरीनाटे येथे गोळीबाराची घटना घडल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी सायेकर कुटुंबाची भेट घेतली. राहुल गांधी यांनाही त्यावेळी या कुटुंबाला भेट देण्याची विनंती करण्यात आली होती. पण त्यांना त्यावेळी शक्य झाले नाही. आता नाणार रिफायनरीला असलेल्या विरोधाला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांचा दौरा होणार असल्याचे समजले. त्यामुळे गांधी यांनी या दौर्‍यावेळी तरी सायेकर कुटुंबाची भेट घ्यावी, अशी विनंती करणारे पत्रही साखरीनाटे मच्छीमारांतर्फे देण्यात आले असल्याचे बोरकर यांनी यावेळी सांगितले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला त्यांचा पाठिंबा मिळाला तर फार चांगले होईल, असेही ते म्हणाले.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प ही येणार्‍या इतर घातक रासायनिक उद्योगांची जननी आहे. येथे निर्मिती होणार्‍या विजेवरच ते प्रकल्प चालणार आहेत. त्यामुळे नाणार विरोधी लढणार्‍या संघर्ष समित्यांना या अणुऊर्जा प्रकल्प विरोधी लढ्यात सामील करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोरकर यांनी सांगितले.जैतापूर अणुऊर्जाचा सविस्तर प्रकल्प अहवाल नाही. साईटिंग क्‍लीअरन्स नाही. प्रकल्पाची जागा अणुऊर्जा निर्मिती केंद्रासाठी योग्य आहे की नाही याची तपासणी झालेली नाही. अशा या सार्‍या त्रुटींमुळे अणुऊर्जा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प कसा होऊ शकतो? असा सवाल अ‍ॅड. मंगेश चव्हाण यांनी उपस्थित केला. या सर्वांची उत्तरे न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवरील निकालातून मिळणार आहेत. यावेळी अ‍ॅड. ए. एच. पावसकर, इरफान कोतवडेकर, अब्दुल सायेकर, मुहीद खादू, अलिमियाँ हतवडकर, फैयाज नालेकर, सलीम मौला आदी मच्छीमार नेते उपस्थित होते.राहुल गांधींपुढे पेचजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची मुहूर्तमेढ काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात रोवली गेली. तोच प्रकल्प हटवण्यास पाठिंबा देण्याची मागणी साखरीनाटे मच्छीमारांनी केली असल्याने काँग्रेस पेचात सापडली आहे. परिणामी राहुल गांधी यांचा आश्‍वासनाप्रमाणे नाणार दौरा होईल की नाही याकडे लक्ष लागले आहे.

Tags : Konka, Congress, movement, against, Narar