राजापूर : प्रतिनिधी
आघाडी सरकारच्या काळात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रेटताना काँग्रेसकडून कशा प्रकारे दादागिरी करण्यात आली होती. त्याचा पंचनामा करणारे निवेदन जनहक्क समितीकडून देण्यात आल्यामुळे बिथरलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जैतापूर प्रकल्पग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये म्हणूनच त्यांची भेट घेण्याचे टाळले, अशी जोरदार चर्चा आता सर्वत्र सुरु आहे .
रिफायनरी प्रकल्पग्रस्तांच्या प्रकल्पविरोधी भावना जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे एक शिष्टमंडळ खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांच्या नाणार दौर्यावर आले होते. त्यावेळी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधात जोरदार आंदोलन करणार्या जनहक्क समितीने राजापूरच्या शासकीय विश्रामधामवर काँग्रेस शिष्टमंडळाची भेट घेऊन नाणारवासीयांसमवेत जैतापूर प्रकल्पग्रस्तांची देखील भेट घ्यावी व आमच्या समस्या जाणून घ्या, असे निवेदन त्यांना दिले होते. मात्र, दोन दिवसांनंतर काँग्रेसचे शिष्टमंडळ केवळ नाणार प्रकल्पग्रस्तांना भेटले पण जैतापूर प्रकल्पग्रस्तांची भेट त्यांनी घेतली नव्हती. त्याची जोरदार चर्चा जैतापूर परिसरात सुरु आहे.
आघाडी शासनाच्या काळात सत्ताधारी काँग्रेसने जैतापूर प्रकल्प रेटताना कशा पध्दतीने दादागिरी केली होती. त्याचीच पोलखोल जनहक्क समितीच्या निवेदनात करण्यात आली असल्याने आणखी अधिक शोभा नको म्हणूनच काँग्रेस शिष्टमंडळाने जैतापूर प्रकल्पग्रस्तांना भेटण्याचे टाळले असावे, असे अंदाज व्यक्त होत आहेत.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाला राजापुरात पत्रकारांनी जैतापूर प्रकल्पग्रस्तांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला असता त्यांची तारांबळ उडाली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खा. हुसेन दलवाई यांना अखेर या मुद्यावर सारवासरव करावी लागली. यावेळी केवळ नाणार प्रकल्पग्रस्तान्ना भेटण्यासाठी आलो होतो. जैतापूर प्रकल्पग्रस्तांनी दिलेले निवेदन आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना सादर करु व नंतर त्यांच्या सूचनेनुसार जैतापूरवासीयांना भेटू, असे उत्तर देऊन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आपली सुटका करुन घेतली. प्रकल्पग्रस्तांची भेट टाळल्याची चांगलीच चर्चा सुरु आहे.
Tags : atnagiri ranar project, Congress