Fri, Jan 24, 2020 21:43होमपेज › Konkan › राजापूरमध्ये ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’चे जमेना

राजापूरमध्ये ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’चे जमेना

Published On: Apr 13 2019 1:44AM | Last Updated: Apr 12 2019 8:39PM
राजापूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या  मतदानाची तारीख जवळ येत असतानाच दुसरीकडे राजापूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस व राष्ट्रवादीचे सूर अद्याप जुळलेले नाहीत. संभ्रमावस्थेत सापडलेल्या राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आघाडी उमेदवाराऐवजी महाराष्ट्र स्वाभिमानच्या पक्षाचे उमेदवार नीलेश राणे यांचा प्रचार सुरू केला असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

जागावाटपात रत्नागिरी - सिंधुदुर्गची जागा काँग्रेसकडे असल्याने काँग्रेसने नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यानुसार आघाडीच्यावतीने बांदिवडेकर यांनी आपला अर्ज सादर केला होता. राज्यभरात काँग्रेस व राष्ट्रवादीचे सूर जुळत असतानाच राजापूर विधानसभा कार्यक्षेत्रात मात्र आघाडीच्या या दोन्ही पक्षांमध्ये अद्याप समीकरण जुळलेले नाही, अशी स्थिती आहे.

विशेषत: राष्ट्रवादीत संभ्रमाचे वातावरण आहे. काँग्रेसकडून विश्वासात घेतले जात नसल्याची भावना व्यक्त होत आहे. यापूर्वी आघाडीच्या तीन बैठका पार पडल्या.  पण आपल्याला त्याची पुसटशी देखील कल्पना नव्हती. कुणी चर्चा करायला तयार नाही. प्रचाराची दिशा काय ठरली ते समजत नाही. निवडणूक साहित्य अद्याप प्राप्त झालेले नाही. मग आम्ही प्रचारासाठी का जायचे? असे खोचक सवाल राष्ट्रवादीच्या काही पदाधिकारी व कर्यकर्त्यांकडून उपस्थित केले जात आहेत.

या महिन्याच्या 23 तारखेला (एप्रिल) रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील मतदान होणार आहे. असे असतानाच राजापुरातील राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र जोमाने प्रचारात दिसत नाहीत. काही पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र आघाडीचा धर्म म्हणून काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाले असले तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

राष्ट्रवादीच्या बहुतांशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आघाडी उमेदवाराऐवजी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणे यांचा प्रचार सुरू केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. 

याबाबत राष्ट्रवादीच्या एका स्थानिक माजी पदाधिकार्‍याने त्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अहमदनगरमध्ये काँग्रेसचे नेते आमच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसतील तर आम्ही काँग्रेस उमेदवाराचा प्रचार का करावा? असा सवाल देखील राष्ट्रवादीच्या त्या माजी पदाधिकार्‍याने उपस्थित केला आहे. राज्यात दोन्ही काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असतानाच राजापुरात मात्र या दोन्ही पक्षांमधे संवाद जुळलेला नसल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादीकडून असहकाराचे धोरण अवलंबले गेल्याने काँग्रेसला त्याचा फटका बसणार हे निश्चित आहे. आता काँग्रेसकडून राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांची कशी समजूत काढली जाते त्यावरच आघाडी उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे.