Sun, May 26, 2019 11:19होमपेज › Konkan › चिपळुणात होणार काँग्रेसचा महामेळावा

चिपळुणात होणार काँग्रेसचा महामेळावा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चिपळूण : शहर वार्ताहर

काँग्रेस पक्षाचा कोकण विभागातील महामेळावा चिपळूण येथे माजी आमदार रमेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून या महामेळाव्याला काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहाणार असल्याचे संकेत काँग्रेस वर्तुळातून मिळत आहेत. 

याबाबत काँग्रेस वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार कोकणातील काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी सध्या सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेस पक्षातील सर्वच नेत्यांनी उचल खाल्ली आहे. काँग्रेस पक्षात पुन्हा जुन्याजाणत्या नेते व कार्यकर्त्यांना स्वगृही आणण्यासाठी पक्षाकडून राजकीय डावपेच सुरू झाले आहेत. त्यानुसार, चिपळूणचे माजी आ. रमेश कदम यांना सन्मानाने पुन्हा एकदा स्वगृही आणण्यात पक्षाला यश मिळाले आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसची राजकीय स्थिती पाहता नेतृत्वाअभावी विस्कळीत झालेला पक्ष एकसंध राहावा यासाठी माजी आमदार कदम यांच्यावर कोकणातील काँग्रेसची मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कदम यांना जिल्ह्यापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण कोकणात त्यांचे राजकीय कसब कसे वापरता येईल, याचा अभ्यास सुरू झाला आहे. कदम यांनी चार दिवसांपूर्वी मुंबई येथील पक्षाच्या टिळक भवनात पक्षप्रवेशाचा प्राथमिक सोपस्कार पार पाडला.

यावेळी पक्षातील पहिल्या फळीतील नेते उपस्थित होते. यावेळी सर्वांनीच कदम यांच्यावर कोकणची जबाबदारी सोपविण्याचे संकेत दिले, तर कोकणातील काँग्रेसचे हात बळकट करण्याकरिता चिपळूण येथे पक्षाचा कोकणातील महामेळावा आयोजित केला जाणार असल्याचे समजते. या मेळाव्याला पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान, राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज नेतेही आवर्जून उपस्थित राहाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा महामेळावा डिसेंबरअखेर अथवा नववर्षाच्या पहिल्या पंधरवड्यात होणार असल्याचे काँग्रेस वर्तुळातून समजते.

चिपळुणात 35 वर्षांपूर्वी इंदिराजी आल्याची आठवण

सुमारे 35 वर्षांपूर्वी देशाच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी या चिपळूण येथे पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. शहरातील यु. इं. स्कूलच्या मागील पटांगणावर या सभेचे आयोजन करण्यात आले होते. पवन तलाव मैदानावर त्यांचे हेलिकॉप्टर उतरले होते. यावेळी संपूर्ण कोकणातील जनतेने स्व. गांधी यांचे विचार ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. त्या नंतर सुमारे 35 वर्षांनी गांधी घराण्यातील राहुल गांधी यांच्या रूपाने पुन्हा एकदा चिपळूण येथे पक्षाच्या महामेळाव्याचे आयोजन होणार आहे. राहुल गांधी प्रथमच कोकण दौर्‍यावर येणार आहेत.