Mon, May 27, 2019 07:35होमपेज › Konkan › ‘शिवशाही’वर जप्‍तीची नामुष्की

‘शिवशाही’वर जप्‍तीची नामुष्की

Published On: Jul 26 2018 1:34AM | Last Updated: Jul 25 2018 10:25PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

एसटी महामंडळ भाडेतत्वावर चालवत असलेल्या ‘शिवशाही’ बसेसच्या कर्जाचे हप्ते संबंधित कंपनीकडून थकल्याने बुधवारी कोल्हापूर येथून हिंदूजा लेलँड फायनान्स कंपनीचे अधिकारी दोन  ‘शिवशाही’ बसेस जप्त करण्यासाठी माळनाका येथील विभागीय कार्यालयात दाखल झाले. यावेळी विभाग नियंत्रकांनी संबंधित कंपनी अधिकार्‍यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून याची माहिती दिली असता दोन दिवसा’त थकीत हप्ते भरण्याची ग्वाही दिल्यावर फायनान्स कंपनीचे कर्मचारी पुन्हा कोल्हापूरला परतले.

एसटी महामंडळाने गतवर्षी अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या ‘शिवशाही’ गाड्या आपल्या ताफ्यात समाविष्ट केल्या आहेत. रत्नागिरीत ‘शिवशाही’च्या 53 गाड्या आहेत. या गाड्या सात खासगी कंपनीच्या मालकीच्या आहेत. एसटी महामंडळात दाखल झाल्यापासून पहिल्याच दिवसांपासून या गाड्यांबाबत प्रवाशांच्या तक्रारी आहेत. वेळेवर गाड्या न सुटणे, धीमी गती, मार्गावर धावत असताना मध्येच गाड्या बंद पडणे, ड्रायव्हर प्रशिक्षित नसणे या तक्रारी नित्याचाच झाल्या आहेत. काहीवेळा तर ‘शिवशाही’ऐवजी साध्या गाड्या सोडण्याची वेळ एसटी प्रशासनावर ओढावली आहे. एसटीकडून याचा दंड त्या खासगी कंपनीकडून वसूल केला जातो. 

अहमदाबाद, गुजरात येथील एका खासगी कंपनीने हिंदुजा लेलँड फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन ‘शिवशाही’ बसेस खरेदी केल्या आहेत. मात्र, याचे हप्ते थकल्याने बुधवारी सकाळी कोल्हापूर येथून हिंदुजा लेलँड फायनान्स कंपनीचे अधिकारी ‘शिवशाही’च्या (एमएच 46 बीबी 3054) आणि (एमएच 46 बीबी 9023) दोन गाड्या जप्‍त करण्याची नोटीससह एसटीच्या माळनाका येथील विभागीय कार्यालयात कोणतीही पूर्वसूचना न देता धडकले. या गाड्यांचे मार्च महिन्यातच तीन हप्ते थकले होते. न्यायालयात केस दाखल केल्यानंतर या गाड्या जप्तीचे आदेश देण्यात आले. यावर कार्यवाही करण्यासाठी फायनान्सचे कर्मचारी रत्नागिरीत आले.

गाड्या जप्तीची माहिती देण्यासाठी फायनान्स कंपनीचे कर्मचारी विभाग नियंत्रक अनिल म्हेतर यांना भेटले यावेळी त्यांनी संबंधित गाडीच्या कंपनीकडे संपर्क साधून याची माहिती दिली. त्या कंपनीच्या अधिकार्‍यांनी दोन दिवसांत थकीत पैसे भरतो, अशी ग्वाही दिल्यावर जप्तीची कारवाई न करता फायनान्सचे कर्मचारी कोल्हापूरला परतले.

‘शिवशाही’ची देखभाल दुरुस्ती नाही
यावेळी गाड्यांची पाहणी केली असता. त्यांच्या देखभाल, दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून आले. गाडीचा रंग ठिकठिकाणी उडाला आहे. गाडीच्या टायरमधून तारा बाहेर आलेल्या आहेत. पुढील काचेला तडा गेला असून, ती कधीही फुटण्यचा धोका आहे. गाडीतही अस्वच्छता आहे. जी कंपनी गाडीची देखभाल करू शकत नाही ती कर्जाचे हप्ते वेळेत कशी फेडणार, असा प्रश्‍न यावेळी हिंदूजा लेलँड फायनान्स कंपनीच्या अधिकार्‍यांनी केला.