Tue, Apr 23, 2019 21:48होमपेज › Konkan › संगणक परिचालक सोडताहेत नोकर्‍या

संगणक परिचालक सोडताहेत नोकर्‍या

Published On: May 10 2018 1:36AM | Last Updated: May 09 2018 8:23PMदापोली : प्रवीण शिंदे 

दापोली तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील डाटा ऑपरेटर यांच्या पदरी निराशा आहे. चार महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मानधन मिळत नसल्याने नोकर्‍या सोडण्याची वेळ संगणक परिचालकांवर येत आहे.

दापोली तालुक्यामध्ये एकूण 106 ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतींमध्ये पूर्वी 84 डाटा ऑपरेटर कार्यरत होते. आता फक्‍त 47 कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांची नियुक्‍ती महाऑनलाईनने पाच वर्षांच्या करारावर केली होती. 6000 रूपये मानधन आणि स्टेशनरी खर्च असे डाटा ऑपरेटरना मानधन मिळत होते. तेराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींकडून दरमहा 8000 रूपये डाटा ऑपरेटर यांच्या मानधन आणि स्टेशनरी खर्च यावर खर्ची घातले जात होते. असा डाटा ऑपरेटर यांचा कारभार सुरळीत सुरू होता.

मात्र, त्यानंतर ‘आपले सरकार’ सेवा केंद्र यांच्याकडे डाटा ऑपरेटर यांचा अधिभार सोपविण्यात आला. त्यानंतर त्यांच्या कार्यालयीन पद्धतीमध्ये बदल करून डाटा ऑपरेटरांवर अतिरिक्‍त ग्रामपंचायतींचा कार्यभार सोपवण्यात आला. तर मानधनदेखील वेळेत मिळेनासे झाले आहे. त्यामुळे दापोली तालुक्यातील 85 डाटा ऑपरेटर पैकी अनेकांनी काम सोडले. आता तालुक्यामध्ये 47 डाटा ऑपरेटर मानधनाविना रुजू आहेत. 

शासनाच्या चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींकडे येणार्‍या निधीमध्ये दहा टक्के खर्च डाटा ऑपरेटर यांच्यावर खर्च करण्याची तरतूद आहे. मात्र, अद्याप तरी डाटा ऑपरेटरच्या हाती काहीच लागले नाही. प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र डाटा ऑपरेटर हवा म्हणून शासन दरबारी ग्रामपंचायतींनी मागणी केली आहे. मात्र, शासनाने ग्रामपंचायतींच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. डाटा ऑपरेटरना नियमित मानधन वेळेत मिळावे, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दिल्या आहेत. दर 15 तारखेला डाटा ऑपरेटर यांना मानधन मिळेल, असे घोषित केले आहे. मात्र, अद्याप डाटा ऑपरेटर यांची उपासमार सुरूच आहे.

असोंडचे सरपंच भरत दाभोळकर यांनी डाटा ऑपरेटर यांची कैफियत गटविकास अधिकारी यांच्याकडे सभेमध्ये मांडली होती. मात्र, त्या मागणीचा विचार झाला नाही. यावर भरत दाभोळकर यांनी उपाययोजना म्हणून असोंड ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र डाटा ऑपरेटरची नियुक्‍ती केली. ग्रामपंचायतीकडून डाटा ऑपरेटर यांना मानधन दिले जात आहे. अशी स्थिती अनेक ग्रामपंचायतींमध्ये असून रखडलेल्या मानधनाविषयी गांभीर्याने घेऊन त्यांना मानधन द्यावे, अशी मागणी होत आहे.