Tue, Jul 23, 2019 06:13होमपेज › Konkan › कंपन्यांची अरेरावी चालणार नाही : नीतेश राणे

कंपन्यांची अरेरावी चालणार नाही : नीतेश राणे

Published On: May 28 2018 1:41AM | Last Updated: May 27 2018 8:32PMरत्नागिरी : प्रतिनिधी

आंबा कॅनिंगच्या क्षेत्रात  रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करणार्‍या कंपन्या आंबा उत्पादक शेतकर्‍यांकडून आंबा कवडीमोलाच्या दराने खरेदी करीत आहेत. या कंपन्यांची अरेरावी, शेतकर्‍यांवरील हुकूमशाही आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा आ. नीतेश राणे यांनी दिला. सातत्याने विनंती करूनही कॅनिंगच्या आंब्याचा दर सोळा रुपयांपर्यंत आणून शेतकर्‍यांवर अन्याय केल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकर्‍यांच्या कष्टाची कंपन्यांकडून चेष्टा केली जात आहे. कोकणातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांना कोणीच वाली नाही आणि आपल्याला कोण विचारणारे नाही, अशा अविर्भावात कॅनिंगच्या आंब्याचा दर कमी केला जात असेल आणि शेतकर्‍यांची पिळवणूक कंपन्या करीत असतील तर हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. आंबा उत्पादक शेतकर्‍यांसाठी आम्हाला ठोस आणि निर्णायक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा आ. राणे यांनी दिला.

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ. नितेश राणे यांनी  कॅनिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या ‘मोनोपॉली’वर सडकून टीका केली. मनाला येईल तो दर कंपन्यांना ठेवता येणार नाही. तसे करत असाल तर ते खपवून घेणार नाही, असा दमही त्यांनी यावेळी दिला. या पत्रकार परिषदेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश राणे, संदीप साटम उपस्थित होते.

आ. नितेश राणे म्हणाले की, आंबा बागायतदार शेतकर्‍यांचा आंबा किमान 35 ते 40 रुपये किलो दराने घ्यावा, यासाठी संपर्क साधून विनंती केली होती. आंबा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकर्‍यांच्या कष्टाचा विचार करता आंब्याचा दर खूप खाली उतरवू नये, असे सांगितले आहे. तरीही दिवसेंदिवस दर कमी करत जाण्याचा प्रकार सुरू आहे. सिंधुदुर्गात सात ते आठ कंपन्या कॅनिंगचा आंबा खरेदी करण्याचे काम करतात.

कंपन्यांच्या या भूमिकेबद्दल रत्नागिरी-सिंधुदुर्गातील आंबा बागायतदार शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. कंपन्यांच्या या मनमानी कारभाराविरुद्ध आमची सर्व ताकद उभी करू. शेतकर्‍यांच्या आंब्याला अपेक्षित दर मिळण्यासाठी त्यांच्यामागे सक्षमपणे उभे राहू. शेतकर्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही. भविष्यात आंबा उत्पादकांना एकत्र करून ठोस भूमिका घेऊन कारवाईचा निर्णयही घेतला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.