Fri, Jan 24, 2020 21:43होमपेज › Konkan › पावसामुळे येतोय शोधकार्यात व्यत्यय 

पावसामुळे येतोय शोधकार्यात व्यत्यय 

Published On: Jul 07 2019 1:30AM | Last Updated: Jul 06 2019 10:01PM
चिपळूण : खास प्रतिनिधी

दिवसभर कोसळणार्‍या पावसाने उतर रत्नागिरीला झोपडून काढले आहे. येथील वाशिष्ठी खेडमधील जगबुडी नदीने सायंकाळी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे तिवरे येथील धरणफुटीत बेपत्ता असणार्‍या चार जणांचा शोध घेण्यात एनडीआरएफच्या जवानांना अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत 19 मृतदेह हाती लागले असून, अजूनही चार जणांचा शोध सुरू आहे. 

शनिवारी चिपळूण, खेड, दापोली, गुहागर आणि मंडणगड या तालुक्यांना पावसाने झोडपून काढले आहे. वारा आणि काळोख करून येणार्‍या सरी यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, चिपळूण शहरातून वाहणार्‍या शिव आणि वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास शहरात पूरसद‍ृशस्थिती निर्माण होऊ शकते. दिवसभर जोराच्या वार्‍याबरोबर पाऊस झाल्याने शहरातील नाले, गटारे तुडूंब भरून वाहू लागली आहेत. सायंकाळी उशिराने  चिपळूणची वाशिष्ठी तसेच खेडमधील जगबुडी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. जोरदार पावसामुळे शहरातील बहादूरशेख येथे वाहतूक बंद ठेवण्यात आली असून ती बायपासने वळवण्यात आली आहे. पावसामुळे धर दुर्घनेनंतर  बेपत्ता झालेल्यांसाठी सुरु असलेल्या शोधकार्यात मात्र व्यत्यय येत आहे. 

तिवरे आकले, दादर येथील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. अशाही परिस्थितीत वाशिष्ठी नदी पात्रात जाऊन एनडीआरएफचे जवान शोधकार्य करीत आहेत. काठीच्या आधाराने हे काम सुरु आहे. मात्र, पा ऊस वाढताच नदी किनार्‍यावर झाडा -झुडपात शोध घेण्यात येत आहे.

धरण फुटीच्या दुर्घटनेनंतर तिवरे येथे महसूल यंत्रणेने तळ ठोकला असून घटनेला तीन दिव उलटले तरी पंचनामे, मदतकार्य आणि पुनर्वसन यासाठी  ही यंत्रणा काम करीत आहे.तहसीलदार जीवन देसाई, यांच्या  मार्गदर्शनाखाली बाधित लोकांना मदतकार्य आणि पंचनाम्याचे काम सुरु आहे.  अशातच धो -धो कोसळणार्‍या पावसामुळे शेतीचे पंचनामे करण्यास अडथळा येत आहे. 

दुसर्‍या बाजूला आरोग्य यंत्रणा तिवर येथे सज्ज झाली असून तिवरे व कादवड येथे पाणी नमूने तपासणी सुरु आहे. औषध फवारणी, रुग्णशोध मोहीम राबविण्यात येत आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव व आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे. मुसळधार पावसात ही यंत्रणा काम करीत आहे.