होमपेज › Konkan › भाजपा जिल्हाध्यक्षांच्या प्रतिमेचे गिर्ये येथे दहन

भाजपा जिल्हाध्यक्षांच्या प्रतिमेचे गिर्ये येथे दहन

Published On: Jan 23 2018 10:23PM | Last Updated: Jan 23 2018 9:51PMदेवगड/ विजयदुर्ग : प्रतिनिधी

‘गिर्ये-रामेश्‍वर क्षेत्रात होणारा ग्रीन रिफायनरी प्रकल्प भाजपानेच आणला आणि तो आम्ही करणारच’, अशी ठाम भूमिका घेणारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या प्रतिक्रियेवर गिर्ये, रामेश्‍वर ग्रामस्थांनी मंगळवारी गिर्ये कॅन्टीन येथे जठारांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आपल्या तीव्र भावना व्यक्‍त केल्या. हिम्मत असेल तर जठारांनी गिर्ये येथे येऊन प्रकल्पाच्या समर्थनार्थ  जाहीर सभा घ्यावी, असे आव्हान संघर्ष समिती व प्रकल्पग्रस्तांनी या वेळी दिले.

यावेळी जठारांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. रिफायनरी प्रकल्पाबाबत जनतेमधून तीव्र विरोध होत असताना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकल्पाच्या समर्थनार्थ भूमिकेचे तीव्र पडसाद गिर्ये, रामेश्‍वर परिसरात उमटले. मंगळवारी जठार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन संघर्ष समिती, प्रकल्पग्रस्त व स्थानिक ग्रामस्थांनी गिर्ये कन्टीग येथे केले. संघर्ष समितीचे स्थानिक अध्यक्ष मुनाफ ठाकुर, उपाध्यक्ष प्रभाकर देवळेकर, बबन घाटये, शरजू घाटये, आरिफ बगदादी, जि. प. सदस्या सौ. वर्षा पवार, संदीप डोळकर, अतुल आंबेरकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना व्यक्‍त केल्या.
संघर्ष समितीचे अध्यक्ष ठाकुर म्हणाले, रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होणार, असे जठार म्हणत असतील तर या प्रकल्पाला येथील प्रकल्पग्रस्तांसहीत जनतेचा तीव्र विरोध राहील.

ज्या जठारांना देवगड तालुक्यामध्ये फूड प्रोसेसिंग युनिटची माहिती नाही. त्यांनी रिफायनरी प्रकल्प घेऊन येण्याच्या बाता मारू नयेत. कोणताही प्रकारचा विनाशकारी प्रकल्प या परिसरात होऊ देणार नाही. जठारांच्या ‘रिफायनरी प्रेमाचा’चा उद्देश येथील जनतेला चांगला माहीत आहे, अशी उपरोधीक टीका त्यांनी केली. जठारांना येथील जनतेने एकेकाळी आमदारकी दिली, ही मोठी चूक  होती. रिफायनरी प्रकल्प प्रदूषणकारी नाही, असे जठारांना वाटत असेल तर त्यांनी मांडलेल्या पाच मुद्द्यांची माहिती गिर्ये येथे येऊन जनतेला द्यावी, असे आव्हान त्यांनी श्री. जठार यांना केले. यापूर्वी ग्रामसभेच्या ठरावा
मध्येही प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यात आला आहे. 26 जानेवारी रोजी होणार्‍या ग्रामसभेतही प्रकल्प विरोधात ग्रामस्थांची भूमिका राहील, असे ठाकुर यांनी सांगितले. 

संदीप डोळकर म्हणाले, जठार हे प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक युवकांना नोकरीचे गाजर दाखवितात. आतापर्यंत त्यांनी स्थानिक युवकांना किती नोकर्‍या दिल्या, हे त्यांनी जाहीर करावे. स्थानिक युवकांना रिफायनरीतील नोकरीची गरज नाही. जठार यांनी भाजपाची भूमिका जाहीर मांडायची असेल तर त्यांनी गिर्येत येऊन मांडावी. स्थानिक जनतेचे नव्हे तर स्वतःचे पक्षातील पुनर्वसन चांगल्या प्रकारे करावे, यासाठीच त्यांचा हा खटाटोप असल्याचा आरोप त्यांनी केला.
आरिफ बगदादी म्हणाले, कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प गिर्ये किंवा परिसरामध्ये 100 टक्के होणार नाही, अशी ठाम भूमिका येथील जनतेने घेतली आहे. जठारांची प्रकल्पाबाबत असलेली भूमिका ही केवळ त्यांच्या फायद्यासाठीच आहे.  शरयू घाट्ये म्हणाले, गिर्ये येथील समुद्र व खाडीपासूनच्या जमिनी या सीआरझेडमध्ये येतात. उर्वरित मधील भागातील परिसर हा प्रकल्पामध्ये घेऊन येथील जनतेला विस्थापित करण्याचे काम सरकार करीत असेल तर आमची विरोधाची भूमिका तीव्र स्वरुपाची राहील. आगामी काळात हे आंदोलन तीव्र असेल, असा इशाराही त्यांनी दिला.