Wed, Apr 24, 2019 19:38होमपेज › Konkan › ‘आयुष्यमान भारत’ वरून रत्नागिरीत शीतयुद्ध 

‘आयुष्यमान भारत’ वरून रत्नागिरीत शीतयुद्ध 

Published On: May 04 2018 10:35PM | Last Updated: May 04 2018 10:28PMरत्नागिरी : शहर वार्ताहर

देशातील गरीब लोकांच्या आरोग्यासाठी ‘आयुष्यमान भारत’ योजना केंद्र सरकारने जाहीर केली. ही योजना गरीब, वंचित, शोषितांना आरोग्याच्या सेवा देणारी आणि आरोग्य कवच देणारी योजना ठरणार आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी कशी होणार यावर या योजनेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात या योजनेचे काम कोणी करावे, यावरून मतभेद आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मात्र आशा आणि आरोग्यसेविका ग्रामसेवकांच्या मनमानीमुळे भरडल्या जात आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातही काम कोणी करावे, यावरून शीतयुद्ध सुरू आहे. या शीतयुद्धात आशा आणि आरोग्यसेविका भरडल्या जात आहेत. योजनेचे काम करण्यास ग्रामसेवक टाळाटाळ करीत असल्याने  या कामाची जबाबदारी आशा आणि आरोग्यसेविका यांच्या खांद्यावर आली आहे. चूल, मूल, संसार या रहाटगाड्यात नोकरी आणि तीही अत्यावश्यक अशा सेवा देणारी आरोग्य विभागाची, अशी अवस्था आशा आणि आरोग्यसेविकांवर आली आहे. आपल्या कामात नेहमी तत्पर असणार्‍या आशा आणि आरोग्यसेविका नित्याच्या कामासोबत नव्याने जबाबदारी आल्याने पेलण्याची तयारी त्यांनी केली आहेच. मात्र नित्याच्या ढिगभर कामात या योजनेचे सर्व्हेक्षण आल्याने शीतयुद्ध सुरू आहे. 

केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी योजनांमधील ही योजना गरीबांसाठी जीवनदायी ठरणार आहे.  या योजनेची रत्नागिरी जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यास सुरूवात करण्यातच अडचण आली. ग्रामसेवकांनी ही जबाबदारी उचलण्यास टाळाटाळ केल्याने योजना अडचणीत आली आहे. नुकतेच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आशा आणि आरोग्यसेविकांचे एकत्रित प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. मात्र ग्रामसेवकांनी दांडी मारल्याने  त्यांचे काम आरोग्य सेविका व आशा यांच्यावर सोपविण्याचे मनसुबे आखण्यात आले. मात्र आरोग्य सेविका आणि आशा या दोन्ही पदांवर काम करणार्‍या महिलांना या योजनेचे काम आपल्या अन्य कामासोबत करणे अडचणीचे ठरत आहे. 

आयुष्यमान भारत योजना हे राष्ट्रीय कार्य असून त्या कार्याला विरोध आरोग्यसेविका करीत नसून आधीच आरोग्यसेविकांना दिलेल्या ढिगभर कामात आणखी सर्व्हेक्षणाची वाढ केल्याने नाराजी आहे. आधीच आरोग्यसेविकांना मातृवंदना, आरसीएच डाटा एन्ट्री व डॉक्युमेंट गोळा करणे, 2018-19च्या याद्यागोषवारे, प्रसुतीला जाणे, 24 तास ड्युट्या या कामांमुळे ताणतणाव सहन करावा लागत आहे. त्यातच दारिद्य्ररेषेखालील यादी करण्याचे कामही आरोग्यसेविकांच्या माथ्यावर मारण्याचे नियोजन आहे. प्रत्यक्षात दारिद्य्ररेषेखालील यादी करण्याचे काम आणि आयुष्यमान योजनेचे सर्व्हेक्षण ही कामे ग्रामसेवकांना करणे सोपे जाते. तरीही त्यांच्याकडे ही कामे सोपवण्यात आलेली नाहीत. आयुष्यमान योजनेचे प्रशिक्षण ग्रामसेवक, आरोग्यसेविका, आशा असे संयुक्‍त झाले. मात्र या प्रशिक्षणात ग्रामसेवक उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांची कामेही आरोग्यसेविका आणि आशांना करावी लागत आहेत. त्यामुळे आरोग्यसेविका आणि आशा यांची ससेहोलपट होत आहे.

दरम्यान, आयुष्यमान योजनेंतर्गत 500 दशलक्ष लोकांना  प्रत्येकी 5 लाख रूपये आरोग्य विमा मिळणार आहे. देशाच्या 40 टक्के लोकसंख्येस सरकारी आरोग्य विमा पुरवला जाणार आहे. याशिवाय, टीबीच्या रूग्णांना दरमहा 500  रुपये दिले जाणधार आहेत. या योजनेंतर्गत 50 कोटी लोकांना 5 लाख रूपये आरोग्य विमा मिळणार आहे. टीबी रूग्णासाठी सरकारकडून दरमहा 500 रूपये,  आरोग्यासाठी 1.5 लाख आरोग्य केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. तीन संसदीय क्षेत्रामध्ये वैद्यकीय महाविद्यालय उघडण्यात येईल, 2 लाख  रूपये प्रिमियमवर अ‍ॅक्सिडेंटल इन्शुरन्स, लोकांच्या घरांच्या जवळपास पाच लक्ष नवीन आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहेत. या योजनेचा असा फायदा असताना तिची अंमलबजावणी करण्यात अडचणी येत आहेत.