Sun, Jul 21, 2019 16:12
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › आचारसंहितेच्या कात्रीत विकासकामांचा खेळखंडोबा

आचारसंहितेच्या कात्रीत विकासकामांचा खेळखंडोबा

Published On: May 24 2018 10:30PM | Last Updated: May 24 2018 10:30PMओरोस  : प्रतिनिधी

विधान परिषद निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागला. या निवडणुकीची आचारसंहिता संपण्यापूर्वीच पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. एकामागोमाग लागू झालेल्या या आचारसंहितेचा परिणाम जिल्ह्यातील विकासकामांवर होणार आहे. आता पावसाळी हंगाम पाहता जिल्ह्यातील बहुतांश विकासकामे ठप्प झाल्यात जमा आहे. अशाप्रकारे आचारसंहितांच्या कात्रीत जिल्ह्यातील विकासकामांचा खेळखंडोबा उडाल्याचे चित्र आहे. 

गेल्या महिन्यापासून लागू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मार्चअखेर मंजूर झालेले तसेच ग्रामपंचायतीच्या 14 वा वित्त आयोग, पाणीपुरवठा आरोग्याच्या कामांची निविदा प्रक्रिया अडकून राहिल्या होत्या. ही कामे विधान परिषद निवडणूक आचारसंहितेनंतर  मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती. ही आचारसंहिता 29 मे रोजी संपणार असल्याने 31 मेपर्यंत प्रलंबित विकासकामांना मंजुरी देण्याचे नियोजन जि. प. प्रशासनाने केले होते. मात्र, तत्पूर्वीच पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जि. प.चे नियोजन कोलमडले आहे. ही निवडणूक आचारसंहिता 3 जुलैपर्यंत लागू राहणार आहे. आता काही दिवसांतच मान्सूनचे आगमन होणार आहे. ही प्रलंबित विकासकामे पुढील  किमान पाच महिने होऊ शकणार नाहीत. 

विधान परिषद निवडणूक आणि त्यानंतर पाच, सहा दिवसानंतर पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागेल या भ्रमात जिल्हा प्रशासकीय यंत्रणा होती. लागोपाठच्या आचारसंहितेमुळे ग्रामपंचायत स्तरावरील अनेक विकासकामे तसेच 14 वा वित्‍त आयोग, आमदार, खासदार व डोंगरी निधीतून मंजूर कामे खोळंबणार आहेत. तसेच रस्ते दुरुस्तीची कामेही रखडल्याने नागरिकांना या पावसाळ्यातही खड्डेमय व चिखलमय रस्त्यांमधून प्रवास करण्याची कसरत करावी लागणार आहे.