Wed, Jun 26, 2019 18:23होमपेज › Konkan › मुरुडजवळ तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले

मुरुडजवळ तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले

Published On: Mar 10 2018 4:12PM | Last Updated: Mar 10 2018 5:24PM
गिमवी / अलिबाग : प्रतिनिधी 

रायगड जिल्ह्यातील मुरुड नजीकच्या नांदगाव येथील मोराबंदर परिसरात गस्त घालणारे तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. या  दुर्घटनेत एक महिला पायलट जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले आहे.

या हेलिकॉप्टरमधून चार जण प्रवास करीत होते.  इतर तीन अधिकारी किरकोळ जखमी झाले आहेत. नौदलाच्या हेलिकॉप्टरने तातडीने हेलिकॉप्टर कोसळल्या ठिकाणी झेप घेतली आणि जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याला हेलिकॉप्टरने उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात आले आहे. हा अपघात कशामुळे घडला याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.

गस्त घालण्याच्या दैनंदिन कामकाजाचा भाग म्हणून शनिवारी  दुपारी तटरक्षक दलाच्या  हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्याच्या किनार पट्टीवर उड्डाण केले होते. दुपारी तीन वाजता हे हेलिकॉप्टर मुरुड तालुक्यातील मोरा बंदर परिसरात गस्त घालीत होते. या हेलिकॉप्टरमध्ये तटरक्षक दलाचे तीन अधिकारी आणि पायलट असे एकूण चार जण होते. मोराबंदर परिसरात हे हेलिकॉप्टर आले असता अचानक हेलिकॉप्टर मोरा बंदर परिसरातील किनार पट्टीवर कोसळले. या अपघातात महिला पायलट अधिकारी जखमी झाली आहे. तर उर्वरित  जण किरकोळ जखमी झाले आहेत. हेलिकॉप्‍टर कोणत्या कारणामुळे कोसळले याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही. घटना घडल्यानंतर नौदलाचे एक पथकही तातडीने मदतीसाठी नांदगाव परिसरातील घटनास्थळी पोहोचले आहे.