Tue, Jun 25, 2019 16:04होमपेज › Konkan › तटरक्षक दलाचे होवरक्राफ्ट रत्नागिरीत

तटरक्षक दलाचे होवरक्राफ्ट रत्नागिरीत

Published On: Jan 12 2019 1:32AM | Last Updated: Jan 12 2019 12:28AM
रत्नागिरी : शहर वार्ताहर

तटरक्षक दलाचे आयसीजीएस एच 198 हे होवरक्राफ्ट देशाच्या पश्‍चिम किनार्‍यावर गस्त घालत असताना दि. 10 रोजी रत्नागिरीच्या भाट्ये समुद्र किनारी दाखल झाले. त्या अनुषंगाने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी सकाळी या होवरक्राफ्टच्या कार्यप्रणालीची पाहणी करून सागरी सुरक्षेचा आढावा घेतला. 

तटरक्षक दलास रत्नागिरी येथे आद्ययावत होवरपोर्ट निर्माण करण्याचे असून, त्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे भाट्ये बीच येथे सुमारे 3 एकर जमीन तटरक्षक दलाला हस्तांतरित केली आहे. होवरक्राफ्ट हे पाणी आणि जमीन या दोन्हींवर चालणारे उभयचर जहाज आहे. जेट इंजिनाच्या साहाय्याने होवरक्राफ्ट हे जमीन अथवा पाणी यावर हवेची एक मोठी गादी तयार करते आणि पृष्ठभागावर अधांतरी धावते. यामुळे ते बर्फाळ प्रदेश, दलदल, वाळूचे पुळण इतकेच काय तर रस्त्यांवरही सहजरित्या ताशी सुमारे 70 कि.मी. इतक्या वेगाने धावत जेथे साधारण जहाजांना प्रवेश करता येत नाही, अशा दुर्गम भागात हे जहाज तस्कर किंवा राष्ट्रद्रोही कार्यवाया करणार्‍या लहान जहाजांचा किंवा व्यक्तीचा पाठलाग करू शकते. 

रत्नागिरी हे देशाच्या पश्‍चिम किनार्‍यावरील मुंबई ते गोवा या दोन महत्वाच्या ठिकाणांच्या मध्यावरील केंद्र असल्याने यास सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मोठे महत्व प्राप्त झाले आहे. नजीकच्या काळात भाट्ये येथे होवरपोर्टचे काम पूर्ण होताच रत्नागिरी येथे तटरक्षक दलाचे तीन होवरक्राफ्ट सदैव तैनात असणार असून अरबी समुद्रातून मार्गक्रमण करणार्‍या तटरक्षक दलाच्या इतर होवरक्राफ्टना देखील या होवरपोर्टवर पार्किंग, रसद पुरवठा किंवा तांत्रिक मदत इत्यादी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

रत्नागिरीमार्गे मुंबई ते मंगळुरु दरम्यान गस्ती घालणार्‍या या तटरक्षक दलाच्या होवरक्राफ्टची शुुक्रवारी रत्नागिरीचे जिल्हाधिरी सुनील चव्हाण, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले तसेच रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अरविंद माळी यांनी पाहणी केली. त्यांना तटरक्षक दल रत्नागिरीचे कमांडर कमांडंट एस. आर. पाटील यांनी होवरक्राफ्टच्या कार्यप्रणाली आणि प्रभावीपणा याबद्दल अवगत केले. रत्नागिरीमार्गे होवरक्राफ्टच्या अशा गस्ती सध्या वारंवार हाती घेण्यात येत असून भाट्ये येथे होवरपोर्टची निर्मिती झाल्यानंतर कोकणचा समुद्र किनारा अभेद्य होईल, असे कमांडंट पाटील यांनी सांगितले.