Tue, Jun 02, 2020 23:59होमपेज › Konkan › समुद्रात महाकाय लाटा; किनारपट्टीवर वादळाची शक्यता

समुद्रात महाकाय लाटा; किनारपट्टीवर वादळाची शक्यता

Published On: May 27 2018 1:19AM | Last Updated: May 26 2018 10:18PMदेवगड : प्रतिनिधी

उपरच्या वार्‍यामुळे समुद्र खवळला असून, महाकाय लाटा किनार्‍यावर धडकत आहेत.समुद्रात वादळसदृश वातावरण निर्माण झाल्यामुळे मच्छिमारी व्यवसाय बंद असून, येत्या चार दिवसांत मच्छीमारीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे.

समुद्रात पावसाळ्यापूर्वीचे वातावरण निर्माण होऊ लागले असून, उपरच्या वार्‍याने समुद्र खवळला आहे. समुद्रात घाळाघाळ निर्माण झाल्याने मच्छीमारी नोैका समुद्रात मच्छीमारीसाठी गेल्या नाहीत. यामुळे गेले दोन दिवस मच्छीमारी व्यवसाय ठप्प आहे.

1 जूनपासून समुद्रातील मच्छीमारी पूर्णत: बंद होणार आहे. मात्र, शेवटच्या चार दिवसांत मच्छीमारी करणार्‍या नौकांना वातावरणाचा फटका बसला आहे. त्यामुळे चार दिवसांतच मच्छिमारी हंगाम संपण्याच्या मार्गावर असून, त्यादृष्टीने मच्छिमार आवराआवरीच्या तयारीला लागले आहेत.

मच्छिमारी हंगामाच्या अंतिम टप्प्यात यांत्रिक नौकांना कोळंबी व लेप ही मासळी मिळत होती. मात्र, मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे दर वधारले आहेत. मे महिन्याच्या सुट्टीच्या कालावधीत बहुतांश मुंबईकर चाकरमानी आले आहेत. मात्र, समुद्रातील दर्जेदार मासळीचे प्रमाण कमी झाल्यामुळे मिळत असलेल्या मासळीचे दर गगनाला भिडले आहेत त्यामुळे खवय्यांनी खाडीतील मासळी, मुळे, कालवे व सुकी मासळी  विकत घेण्यावर भर दिला आहे. मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे नौका किनार्‍यावर घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, उर्वरित नौका पौर्णिमेच्या उधाणाला किनार्‍यावर घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.मच्छिमार आता हंगाम संपातानाची जाळी धुणे,सुकविणे,फायबर पाती किनार्‍यावर घेणे,ट्रॉलर्स किनार्‍यावर घेणे व त्यानंतर ते शाकारणे इत्यादी कामे करण्याच्या तयारीला लागले आहेत.

किनारपट्टीवर वादळाची शक्यता

मान्सूनचे  महाराष्ट्रातील प्रवेशद्वार समजल्या जाणार्‍या कोकणात मोसमी पाऊस सक्रिय होण्याला पुष्टी मिळाली असली, तरी वादळी वार्‍यामुळे त्याचे आगमन लाबंण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, आखाती देशात उद्भवलेल्या वादळी स्थितीने कोकण किनारपट्टीसह गोव्यात वादळी  वार्‍याचा तडाखा बसण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. वादळाची तीव्रता रत्नागिरीसह रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरात तसेच श्रीलंकेच्या दक्षिण भागाकडे चक्राकार वार्‍याची स्थिती तयार झाली आहे. उत्तरेकडील बाप्षयुक्‍त वातावरण दक्षिणेकडे खेचले जात आहे. त्यामुळे कोकणात ढगाळ हवामान तयार होऊन वार्‍याचा वेग वाढण्याची अटकळ हवामान विभागाने आपल्या हवाई संदेशात वर्तविली आहे.

वेगवान वार्‍यामुळे शनिवारी किनारपट्टी भागात जोरदार लाटांचा मारा होत होता. यामुळे बंदर विभागाकडून सावधगिरीचा इशारा दर्शविणारा बावटा लावण्यात आला पर्यटक  आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

शुक्रवारी रात्रीपासून जिल्ह्यात जोरदार वार्‍याचा मारा होत होता. त्यामुळे किनारपट्टी भागात लाटांचा मारा किनार्‍यावर होत होता. समुद्र खवळलेला असल्याने सर्वत्र खबरदारी घेण्याचे निर्देश दिले जात आहेत. या वादळी स्थितीने रत्नागिरी, रायगड, मुंबई तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

मालवण-वसईदरम्यान मोठ्या लाटांची भीती

भारतीय हवामान विभागाकडून (आयएमडी) शनिवारी वर्तविलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार मालवण ते वसई या किनार्‍यावर 3 ते 3.20 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी या कालावधित मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा  देण्यात आला आहे.  त्यानुसार येथील जिल्हा प्रशासनाला सावधगिरी बाळगण्याच्या सूचना करताना पोलिसांनाही  सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.