Mon, Jun 24, 2019 21:02होमपेज › Konkan › समाजकल्याण आराखड्यावरून गोंधळ

समाजकल्याण आराखड्यावरून गोंधळ

Published On: Mar 05 2018 9:23PM | Last Updated: Mar 05 2018 9:20PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सादर करण्यात आलेला समाजकल्याण समितीचा आराखडा सर्वसमावेशक नसल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी या सभेत हंगामा केला. आपण शिफारस केलेली कामे दुसर्‍याच्या नावावर टाकल्याने विरोधक संतापले.

सोमवारी झालेल्या सभेत समाजकल्याण विभागाचा 3 कोटी 20 लाखांचा आराखडा सादर करण्यात आला. यामध्ये 2 कोटी 12 लाख रस्ते विकासासाठी, 21 लाख समाजमंदिरासाठी आणि 89 लाख नळपाणी योजनांसाठीचा समावेश आहे. मात्र, यामध्ये जि. प. सदस्यांना कोणताही निधी देण्यात आलेला नाही. काही सदस्यांनी सुचवलेली कामे जिल्हाप्रमुख, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या नावे टाकण्यात आली आहेत. जर जिल्हा परिषद सदस्यांना डावलण्यात येत असेल तर त्यांना महत्त्व काय? पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या शिफारशीचे नाव आराखड्यात असणे हे गंभीर असल्याचे विरोधी गटाने यावेळी सांगितले.

गत महिन्यात झालेल्या अंदाजपत्रकाच्या बैठकीत समाजकल्याण विभागाचा आराखडा सर्वसमावेशक असेल असे सांगण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. शिक्षण समितीचा आराखडा, विषय समितीचा आराखडा यांच्याबाबत कोणतीही तक्रार नाही. मग समाजकल्याणच्या आराखड्याबाबतीतच तक्रार का करावी लागते? याचा विचार सभागृहाने करावा, असेही विरोधी गटातर्फे सांगण्यात आले.