Thu, Dec 12, 2019 08:15होमपेज › Konkan › दिवसभर ढगाळ वातावरण; आंबा पीक संकटात

दिवसभर ढगाळ वातावरण; आंबा पीक संकटात

Published On: Apr 17 2018 10:41PM | Last Updated: Apr 17 2018 10:41PMवैभववाडी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषत: सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये मंगळवारी पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्हाभरात ढगांचा गडगडाट सुरूच होता. दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे वातावरणातील उष्माही वाढला होता. वैभववाडी तालुक्यात मंगळवारी सायंकाळी वादळीवार्‍यासह हलक्या सरी कोसळल्या. तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यातील गावांमध्ये मेघगर्जनेसह तुरळक पाऊस झाला. या पावसामुळे काजू व आंबा पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

गेले चार-पाच दिवस तालुक्यात उष्णतेत कमालीची वाढ झाली होती. मंगळवारी दुपारनंतर सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळी 6.30 वा. च्या सुमारास मेघगर्जनेसह वैभववाडी तालुक्यात वादळी वार्‍यासह पाऊस झाला. विशेषतः सह्याद्रीच्या पट्ट्यातील भुईबावडा पंचक्रोशीतील गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळल्या. तर काही ठिकाणी दमदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकर्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली. सध्या काजू व आंबा उत्पादनाचा हंगाम आहे.  या अवकाळी पावसाने या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. आंबा व काजू उत्पादनाचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्‍त करीत आहेत. गेले काही दिवस वाढलेली उष्णता वाढल्यानंतर वैभववाडी तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे  हवेत सुखद गारवा निर्माण झाला आहे.परंतु जिथे पाऊस पडला नाही तिथे मात्र उष्म्यामध्ये वाढ झाली आहे.  सायंकाळी उशिरापर्यंत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी पडत होत्या.

कणकवली तालुक्यातील फोंडाघाट, कोंडये, हरकुळखुर्द या भागातही पाऊस पडला. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये गेले काही दिवस अधून मधून पाऊस पडत आहे.  यावर्षी सरासरी एवढा मान्सून पाऊस होणार असल्याची वार्ता हवामान खात्याने वर्तविल्यानंतर शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्याचे वातावरण पाहता यावर्षी वळीवाचा पाऊस लवकर येण्याची शक्यता जाणकार मंडळी व्यक्त करत आहेत.