Thu, Dec 12, 2019 17:33होमपेज › Konkan › शेत नांगरणी स्पर्धा बंद करा

शेत नांगरणी स्पर्धा बंद करा

Published On: Aug 14 2019 12:08AM | Last Updated: Aug 14 2019 12:08AM
देवरूख : प्रतिनिधी 

नजीकच्या पाटगाव येथे झालेल्या शेत नांगरणी स्पर्धेत बैल उधळल्याने 8 जण जखमी होण्याची घटना घडली. या प्रकारानंतर आता या स्पर्धांवरच ओरड सुरू झाली असून बैलगाडी स्पर्धा बंद झाल्यानंतर त्यातून पळवाट म्हणून सुरू झालेली ही मुक्या प्राण्यांची जीवघेणी स्पर्धाच बंद करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. प्राणीमित्र संघटनांनी याविरोधात आवाज उठवण्याची तयारी सुरू केली आहे.  
मुक्या प्राण्यांचा होणारा छळ पाहून न्यायालयाने काही वर्षांपूर्वी बैलगाडी शर्यतींवर बंदी आणली. त्यातून मार्ग काढत कोकणात नांगरणी स्पर्धा सुरू  करण्यात आली. याला राजकीय पाठबळ मिळाल्याने या स्पर्धांचे पेव वाढत निघाले असतानाच देवरूखजवळच्या पाटगाव येथील एका स्पर्धेत बैलजोडी उधळल्याने झालेल्या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या स्पर्धेची सुरक्षितता आणि मुक्या प्राण्यांचे होणारे हाल पुन्हा ऐरणीवर आले असून या स्पर्धांवर संबंधीत विभागांनी बंदी घालावी, अशी मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे. 

बैलगाडी स्पर्धेवरील बंदी उठवण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रयत्न करण्यात आले मात्र बैलगाडी स्पर्धांवरील बंदी कायम राहीली. बैलगाडी स्पर्धांचे नाव बदलून शेतीच्या हंगामात त्याला नांगरणी स्पर्धा असे नाव देत हा जीवघेणा खेळ परत सुरु झाला. शेतकर्‍यांची तरुण पिढी परत शेतीकडे वळावी, त्यांना शेतीची आवड निर्माण व्हावी म्हणून अशा स्पर्धा भरवल्या जात असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र असे होतांना दिसून येत नाही. अपवाद वगळता जेथे नांगरणी होते तेथे एकही भातरोप नंतर लावले जात नाही. 

प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी बैल वेगाने पळावेत यासाठी शेपटी पिरगळणे, खिळे टोेचणे, तिक्ष हत्याराने पायांवर मारणे असे त्यांचे हाल होतील असे प्रकार केले जातात. या स्पर्धांसाठी विविध राजकीय पक्ष, उद्योजक यांच्याकडून निधी आणला जातो. सहभागी होणार्‍या स्पर्धकांकडून प्रवेश फी घेतली जाते. एक स्पर्धेतून किमान लाखभर रूपयांची उलाढाल होते. याला प्रोत्साहन म्हणून राजकीय पक्ष पाठबळ देतात.  स्पर्धा पाहण्यासाठी हजारो लोक उपस्थित असतात. त्यांची सुरक्षा त्यांनी स्वतःच करायची असते. स्पर्धेच्या ठिकाणाला जत्रेचे रुप येते. मात्र अनुचित प्रकार घडल्यास येथे कोणताही पोलीस बंदोबस्त नसतो. 

संगमेश्वर तालुक्यात गेल्या महिन्यापासून नांगरणी स्पर्धांचे अक्षरशः पेव फुटले आहे. खेरशेत येथील स्पर्धेवेळी तर मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. एरव्ही वाहनचालकांशी दांडगाई करणार्‍या वाहतूक पोलिसांना हा अडथळा दिसला नाही. त्यानंतर माखजन येथे अशा स्पर्धा झाल्या. यावेळी स्टेजवर एवढी गर्दी झाली की, स्पर्धा रंगात आलेली असतांनाच स्टेज कोसळले आणि पळापळ होत एकच हाहाकार उडाला. त्यानंतर सोमवारी देवरुखजवळच्या नांगरणी स्पर्धेदरम्यान बैल उधळले आणि आठ दहा जणांना आडवे करत ते सैरावैरा पळू लागले. यात आठ जण जखमी झाले आहेत. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर आता या स्पर्धांवर बंदी आणण्याची मागणी होत आहे. जिल्हाधिकारी, जिल्हावन अधिकारी, तहसिलदारांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून या स्पर्धा तातडीने बंद कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

अन्यथा न्यायालयात जाणार 

बैलगाडी स्पर्धा बंद झाल्या आता नागंरणी स्पर्धेच्या नावाखाली मुक्या प्राण्यांचे हाल सुरू आहेत. सोमवारचा प्रकार हा त्याचेच द्योतक आहे. अजुनही वेळ गेलेली नाही. प्रशासनाने या स्पर्धांवरच बंदी आणावी अन्यथा याविरोधात न्यायालयात जावे लागेल.
- सत्यवान विचारे, सामाजिक कार्यकर्ते