Sun, Jun 16, 2019 02:09होमपेज › Konkan › आंबा-काजू बागायतदारांवर ‘चिंतेचे ढग’

आंबा-काजू बागायतदारांवर ‘चिंतेचे ढग’

Published On: Feb 08 2018 1:47AM | Last Updated: Feb 07 2018 8:58PMखंडाळा : वार्ताहर

मंगळवारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. बुधवारीही दिवसभर तसेच वातावरण राहिले. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचे शिडकावेही पडले. या वातावरणामुळे जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदार धास्तावले आहेत.

यावर्षी पावसाने उशिरापर्यंत हजेरी लावल्यानंतरही वेळेवर थंडी पडायला सुरवात झाली होती. त्यामुळे कलमांना लवकर मोहर आल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. परंतु, लवकर आलेल्या मोहराला फळधारणा झाल्यानंतर थंडी वाढत राहिली. गेल्या महिनाभरात थंडी सुरू राहिल्याने ज्या मोहराला पूर्वी फळधारणा झाली होती त्याच मोहोराला पुन्हा मोहर आला. त्यामुळे जी फळधारणा झाली होती, त्या फळांची मोठ्या प्रमाणात गळ सुरू झाली होती. मंगळवारपासून मळभी वातावरण जिल्ह्यात राहिल्याने पुन्हा एकदा बागायतदार चिंतेत आहे.

यावर्षी पाऊस गेल्यानंतर शेतकर्‍यांनी कलमांवरील पालवीचे संरक्षण करण्यासाठी पहिली फवारणी केली होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ज्या आंबा कलमांना मोहर आला त्याचे संरक्षण करण्यासाठी दुसरी फवारणी शेतकर्‍यांनी केली. दुसरी फवारणी झाल्यानंतर कलमांना दुबार मोहोर आल्यामुळे पहिल्या फळांची गळ झाली आणि फवारणीचा संपूर्ण खर्च वाया गेला. त्यानंतरच्या काळात थंडी वाढत गेल्याने तिसर्‍यावेळी कलमांना मोहर येत आहे. त्यामुळे 5 ते 6 वेळा फवारणी करूनही आंबा पीक धोक्यातच आहे. फवारणीचा खर्च वाढत असल्यामुळे शेतकरी वारंवार कराव्या लागणार्‍या फवारणीला कंटाळला आहे. आता वातावरणात बदल झाल्याने बागायदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

बागायतदार कोलमडला

कोकणातील शेतकरी आंबा काजूच्या पिकांवर आपले वर्षभराचे आर्थिक नियोजन करत असतो. बागांना खत घालणे, बागांची साफसफाई करणे, जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी बागांना कुंपण घालणे, राखण्यासाठी मजूर ठेवणे, औषधांच्या फवारणीचा खर्च या सर्व खर्चाचा मेळ घालून काहीतरी नफा मिळेल याचे गणित विचारात घेऊन शेतकरी आंबा-काजूच्या बागेसाठी मेहनत घेतो. मात्र, बदलत्या वातावरणाच्या तडाख्यात दरवर्षी आंबा आणि काजू ही पिके सापडत आहेत.