Tue, Jul 16, 2019 00:06होमपेज › Konkan › स्वच्छता अभियान केवळ स्पर्धेपुरतेच होते काय? 

स्वच्छता अभियान केवळ स्पर्धेपुरतेच होते काय? 

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 8:04PMकणकवली : अनिकेत उचले

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरिक) अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2018 नुसार कणकवली नगरपंचायतीच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले गेले. मात्र, हे सर्वेक्षण संपताच कणकवली शहरात जागो जागी पुन्हा कचर्‍याचे ढिग निर्माण झालेले दिसत आहेत. यामुळे शहरात अस्वच्छतेचे व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या अस्वच्छतेला कणकवली न.पं.बरोबरबरच नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत. तरीही न. पं. चे स्वच्छता अभियान केवळ  स्पर्धेपुरतेच  होते काय? असा सवाल निर्माण होत आहे.

कणकवली न. पं. तर्फे स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबविली गेली. त्या अंतर्गत विविध उपक्रम राबवून स्पर्धेचे आयोजन करून एकीकडे शहर स्वच्छतेसाठी अपार मेहनत घेण्यात आली. त्या निमित्त कणकवली स्वच्छ व सुंदर भासत होती. स्वच्छतेचा हा वसा शहरवासीय व न. पं. प्रशासन असाच पुढे सुरु ठेवतील, असा सर्वांचाच विश्‍वास होता. मात्र, ही मोहीम संपताच ‘येरे माझ्या मागल्या’ ही उक्‍ती तंतोतंत लागू पडल्याचे दिसत आहे. स्वच्छता सर्व्हेक्षण स्पर्धेसाठी विविध उपक्रम व त्याच्या जाहीरात बाजीवर कोट्यवधीचा निधी खर्ची करण्यात आला. परंतु मोहिमेचा हुरुप टिकून न राहिल्याने शहर पुन्हा अस्वच्छतेकडे ओढले गेले आहे.   

कणकवली-बांधकरवाडी येथे तर काही दिवस कचर्‍याचा ढिगाराच साठून आहे. मोकाट जनावरे हा कचरा रस्त्यावर ओढून आणत आहेत. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी फैलावत आहे. याच ठिकाणी दत्त कृपा, श्रीविष्णू अपार्टमेन्ट, ओंकार कॉम्प्लेक्स आदी मोठी कॉम्प्लेक्स याच परिसरात आहेत. हा मार्ग रेल्वे स्टेशनकडे जात असल्याने या ठिकाणी नागरिकांची ये-जा  असते. याचा त्रास या परिसरातील नागरिकांसोबतच जाणार्‍या येणार्‍या नागरिकांना सहन करावा लागतो. 
हीच समस्या डीपी रोड, दै. पुढारी कार्यालय रोड, सोनगेवाडी रोड, प. पू. भालचंद्र महाराज संस्थान जाणार्‍या रोडवर पहायला मिळते. यामुळे येथील कचरा वेळच्या वेळी उचलणे गरजेचे आहे. तसेच येथील रहिवाशांनीही कचरा रस्त्यावर न टाकता तो घंटागाडी अथवा डस्टबिन मध्ये साठवून न.पं.शी संपर्क साधावा. न.पं.कडूनही  प्रत्येक वार्डात घंटागाडीचे योग्य नियोजन करून ते नागरिकांना माहिती करून देणे गरजेचे आहे. कचर्‍यामुळे भकास वाटणारे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मदत होईल.

प्लास्टिक पिशवी बंदी नावालाच 

कणकवलीत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे.या मोहिमेसाठीही न.पं.कडून विविध उपक्रम राबवून प्लॅस्टिक पिशवी बंदसाठी जनजागृती केली. मात्र, शहरात कचर्‍याच्या ढिगाकडे पहाता यात प्लास्टिक पिशव्यांचा जास्त समावेश असल्याचे दिसून येते. यातून न.पं.च्या प्लास्टिक बंदी निर्णयाचे शहरात खुलेआम उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे.