Tue, Mar 26, 2019 11:43होमपेज › Konkan › सेना खासदारांकडून भाजपशी युतीचे संकेत

सेना खासदारांकडून भाजपशी युतीचे संकेत

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 27 2018 2:02AMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आयोजित केलेल्या शहर विकास विचार मंथन कार्यक्रमात शिवसेना खा. विनायक राऊत यांनी आगामी निवडणुकीत सेना-भाजप युती होण्याचे संकेत दिले. खासदारांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिकवणीतील साम्यतेची आठवण करून दिली. त्याचबरोबर भाजप नेते तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्ह्याच्या विकासासाठी कसे निधी देत आहेत हे सांगितले. पक्षविरहीत विचारमंथन कार्यक्रमात व्यासपीठावर भाजप व सेना नेत्यांचीच उपस्थिती युती होण्याच्या तर्काला दुजोरा देऊन गेली.

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सेवकाच्या भूमिकेतून काम करण्याची शिकवण दिली. त्यामुळेच नगरपिता नगरसेवक झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकसेवक बनायला शिकवले, असे सेना खा. विनायक राऊत यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले दुसरे राज्यातील भाजप नेते तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी आवश्यक असणार्‍या विकासकामांसाठी आग्रही असल्याचे सांगून निधीही देत असल्याचे म्हटले. यापूर्वी भाजप मंत्री, नेते आमची कामे होऊ देत नाहीत असा सेनेकडून सूर निघत होता.

या कार्यक्रमात सेना नेते खा. राऊत यांनी ती आठवण पुसण्याची भूमिका स्वीकारल्याने निवडणुकीत युती होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे संकेत मिळाले. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण ही सुद्धा भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देण असल्याचे खा. राऊत यांनी आवर्जून सांगितले. त्यासाठी त्यांनी भरघोस निधी दिल्याचे सांगून दर्जेदार काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आपली म्हणजे जनतेची असल्याचेही खा. राऊत यांनी यावेळी सूचकपणे सांगितले. इतरही अनेक मोठमोठी विकासकामे कशी होत आहेत याचाही ऊहापोह केला. खासदार एकीकडे युती होण्याचे संकेत देत असतानाच व्यासपीठावरची उपस्थितीसुद्धा तशीच बोलकी होती. खासदारांसह आ. उदय सामंत, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, नगराध्यक्ष राहुल पंडित, भाजप नेते अ‍ॅड. बाबासाहेब परूळेकर, भाजपच्या माजी नगरसेविका भावे उपस्थित होत्या.

या भाजप नेत्यांना आग्रहाने व्यासपीठावर बोलावण्यात आले. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर या एकमेव पक्षविरहीत व्यक्‍तिमत्त्वाची व्यासपीठावर उपस्थिती होती. दोन-चार महिन्यांपर्यंत भाजप मंत्री आमची कामे अडवतात, असा आरोप शिवसेनेकडून होत होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर पुढील निवडणुका स्वतंत्रपणे लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पुन्हा सेना-भाजप युतीसाठी भाजप प्रयत्न करत असल्याच्या वार्ता येऊ लागल्या. त्यावर सेना नेत्यांनी अद्याप जाहीर प्रतिक्रिया व्यक्‍त केली नाही. मात्र, त्याचवेळी अचानक सेना सचिव असलेले खा. विनायक राऊत भाजप मंत्र्यांच्या कामांची स्तुती करू लागल्याने युती होण्याच्या सूतोवाचाला बळकटी मिळत  आहे.