होमपेज › Konkan › बाहेरगावी जाताय...सावधान!

बाहेरगावी जाताय...सावधान!

Published On: May 11 2018 1:38AM | Last Updated: May 10 2018 9:01PMखास प्रतिनिधी, चिपळूण

सुट्टीत गावाला जाताय, जरा सांभाळून.. असे म्हणण्याची वेळ आता चिपळूणवासीयांवर आली आहे. लागोपाठ होणार्‍या घरफोड्यांमुळे येथील नागरिक भयभीत झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबतही सवाल उपस्थित होत आहेत. गेल्या पंधरा दिवसांच्या काळात 28 सदनिका फोडण्यात आल्या. सुदैवाने चोरट्यांच्या हाताला फारसा मुद्देमाल लागला नसला तरी या घटना शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुर्दैवी आहेत.

चिपळुणात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आठ दिवसांपूर्वी गोवळकोट रोड येथील आठ सदनिका चोरट्यांनी फोडल्या त्याचा तपास सुरू असतानाच गुहागर नाका परिसरातील चार इमारतींमधील तब्बल 17 सदनिका फोडण्यात आल्या. ‘रश्मी प्‍लाझा’ नामक एकाच इमारतीमधील तब्बल सात सदनिका चोरट्यांनी फोडल्या, तर बुधवारी रात्री कापसाळ येथे महामार्गालगत पुन्हा तीन सदनिका फोडल्या आहेत. यामुळे चिपळुणात चोरट्यांनी धुमाकूळच घातला आहे. वारंवार होणार्‍या चोर्‍यांमुळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

मध्यंतरी काही काळ चिपळुणातील चोर्‍यांना आळा घालण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र, आता या चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. मे महिन्याच्या सुट्टीनिमित्त गावाकडे गेलेल्यांच्या बंद सदनिका हेरून त्या फोडण्याचा धडाकाच चोरट्यांनी लावला आहे. शहरातील टोकावर असणार्‍या विभागात आलटून पालटून या चोर्‍या होत आहेत. कारण शहराच्या मध्यवस्तीत पोलिसांची नियमित गस्त असते. ती ठिकाणे वगळून थोड्याशा आडोशाला असणार्‍या इमारतींना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे.

आतापर्यंत झालेल्या चोरींमध्ये चोरट्यांनी एकच पद्धत वापरली आहे. कटावणी किंवा हातोड्याच्या साहाय्याने मुख्य दरवाजाची कडी तोडायची, सेफ्टी डोअर असेल तर हॅक्सॉ ब्लेडच्या साहाय्याने कापून तो बाजूला करायचा आणि घरात प्रवेश करून घरातील कपाटे फोडायची. त्यामधील मुद्देमाल लंपास करायचा, असा एकच फंडा चोरट्यांनी अवलंबला आहे. काही ठिकाणी आढळून आलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये चोरट्यांनी या सीसीटीव्हीवरही मात केली आहे. चित्रीकरण झाले तरी ओळखता येणार नाही याची पुरेपूर खबरदारी चोरट्यांनी घेतली आहे. तोंडाला काळा रूमाल, हातमोजे, पाठीवर सॅक, सुटबूट अशा वेषात चोरटे चित्रीत झाले आहेत. मात्र, सीसीटीव्हीमध्ये त्यांची ओळख पटत नाही. दुसर्‍या बाजूला श्‍वानपथक किंवा ठसेतज्ज्ञ यांचाही उपयोग होत नाही. त्यामुळे चोरट्यांनी पोलिसांवर मात केली आहे. अशाप्रकारे एकच फॉर्म्युला चिपळुणातील चोर्‍यांमध्ये अवलंबण्यात आला आहे.

गृहनिर्माण सोसायट्यांनी दक्षता घेणे गरजेचे

शहरात सुरू असलेल्या चोर्‍यांचे सत्र लक्षात घेता नागरिक सर्वच जबाबदारी पोलिसांवर टाकून मोकळे होत आहेत. परंतु, गृहनिर्माण संस्था व सदनिकाधारकांनी याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. पोलिसांनी मध्यंतरी प्रत्येक गृहनिर्माण सोसायटींमध्ये पत्रव्यवहार करून सीसीटीव्ही बसवावेत, सुरक्षा रक्षक नेमावा अशाप्रकारची सूचना केली होती. मात्र, चिपळूणमध्ये काही संस्था वगळता अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले आहे.

शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांनी इमारतीच्या चारही बाजूने व प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही बसवावेत. तसेच रात्रीच्यावेळी सुरक्षारक्षक नेमावा. इमारतीमध्ये फेरीवाले, भटके, भिकारी यांना प्रतिबंध करावा. शहरात रात्रीच्यावेळी पोलिसांची गस्त सुरुच असते. मात्र, नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे. घराबाहेर जाताना आपल्या किमती वस्तू राष्ट्रीयकृत बँकेच्या लॉकरमध्ये किंवा आपल्या सोबत न्याव्यात. अशाप्रकारच्या सूचना चिपळूण पोलिसांकडून देण्यात येत आहेत. सुट्टीच्या कालावधीत नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.