Fri, Apr 26, 2019 17:22होमपेज › Konkan › सभापतीपदासाठी जि. प. सदस्यांमध्ये चुरस

सभापतीपदासाठी जि. प. सदस्यांमध्ये चुरस

Published On: Jul 04 2018 2:14AM | Last Updated: Jul 03 2018 9:09PMरत्नागिरी : प्रतिनिधी

पक्षाच्या धोरणाप्रमाणे सव्वा वर्षांचा कालावधी संपल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि विषय समिती सभापतींनी आपल्या पदांचे राजीनामे गत महिन्यात दिले आहेत. सभापतीपदी नव्याने विराजमान होणार्‍या सदस्यांमध्ये चुरस निर्माण झाली असून. रत्नागिरी तालुक्याचे पारडे जड मानले जात आहे. दहा जि. प. सदस्य निवडून देणार्‍या रत्नागिरी तालुक्याला समाजकल्याण समितीसह महिला व बालकल्याण समितीचे सभापती पदही मिळणार असल्याची चर्चा होत आहे.

दि. 10 जुलै रोजी अध्यक्ष निवड झाल्यानंतर 11 जुलै रोजी विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडताना सव्वा वर्षांनंतर संधी देण्यात येणार्‍या उमेदवारांचीही नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष पदासाठी लांजा तालुक्यातील स्वरूपा साळवी तर उपाध्यक्षपदासाठी मंडणगड तालुक्यातील संतोष गोवळे यांची नावे जाहीर करण्यात आली होती.  अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नावे जाहीर झाली असल्याने या पदासाठी इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. 

रत्नागिरी तालुक्याच्या वाट्याला यावेळी समाजकल्याण सभापती पद येणार आहे. परंतु, समाजकल्याण सभापती पदासाठी सेनेच्या एका गटाकडून प्रकाश रसाळ यांचे नाव पुढे केले जात आहे. परंतु, प्रकाश रसाळ यांना सभापतीपद देण्यात तांत्रिक अडचण असल्याने परशुराम कदम यांचा सभापती पदाचा मार्ग मोकळा समजला जात आहे.

रत्नागिरीला महिला बालकल्याण सभापतीपदही मिळणार आहे. अन्य समित्यांच्या सभापतीपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. यामध्ये खेड तालुक्यातील सुनील मोरे, चिपळूण तालुक्यातील विनोद झगडे, गुहागरमधील महेश नाटेकर आणि संगमेश्‍वरमधील सहदेव बेटकर यांची नावे आघाडीवर आहेत.