Fri, Apr 19, 2019 12:36होमपेज › Konkan › ‘एलईडी’नंतर आ. चव्हाण ‘मैदानात’

‘एलईडी’नंतर आ. चव्हाण ‘मैदानात’

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 9:07PM

बुकमार्क करा

चिपळूण : शहर वार्ताहर

चिपळुणात नुकत्याच झालेल्या विशेष सभेत एलईडी प्रकरण जोरदार गाजले. त्यामुळे या प्रकरणानंतर आता राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेवर आ. सदानंद चव्हाण यांनी लक्ष केंद्रित केले आहे. आ. चव्हाण प्रथमच खेळाच्या मैदानात उतरल्याचे चित्र पहायला मिळत असून राजकारणासह खेळातील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

एरव्ही आपल्या शांत स्वभावाने अनेक घडामोडींकडे दुर्लक्ष करणारे आणि प्रत्येक गोष्टीत ‘थंडा कर के खाओ’ अशी वृत्ती जोपासणारे आ. चव्हाण यावेळी खो-खो स्पर्धेच्या निमित्ताने व एलईडी प्रकरणाच्या राजकीय घडामोडीमुळे प्रत्यक्ष मैदानात उतरल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन टर्म आमदार म्हणून आपली कारकीर्द यशस्वी करताना त्यांना बहुतांश शांत स्वभावाचा फायदा उठवता आला. 

त्यांच्याच कारकिर्दीत दोनवेळा नगर परिषद निवडणुका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुका  झाल्या, तर चिपळूण या सांस्कृतिक राजधानीत विविध क्रीडा प्रकारातील राज्यस्तरीय स्पर्धा देखील पार पडल्या. मात्र या सर्व प्रकारात आ. चव्हाण स्वत: केवळ मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावत होते. 

दरम्यानच्या राजकीय घडामोडीतील स्थित्यंतराचा आढावा घेतला असता, आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांना पर्यायाने शिवसेनेला न. प., पं. स., जि. प.च्या राजकीय मैदानावर आपली पकड राखता आली नाही. त्यामुळे सेना काही प्रमाणात बॅकफूटवर आली. मात्र, सावध झालेल्या आमदारांनी आपल्या शांत स्वभावाला थोडीशी बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. शांत स्वभावाला जोडूनच सेनेला अपेक्षित राजकीय डावपेचांची सोबत घेण्यास आ. चव्हाण यांनी सुरुवात केली आहे. परिणामी, दुसर्‍या टर्ममध्ये हे सेनेतील वर्चस्वाचे राजकीय चित्र काही प्रमाणात पालटले. 

नगर परिषदेत चाराचे अकरा झाले. जि. प. व पं. स.त बरोबरी साधली, तर नेहमीच विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये केवळ सहभाग घेणारे आमदार या वेळच्या राज्यस्तरीय आमदार चषक खो-खो स्पर्धेच्या तयारीला जातीनिशी मैदानात उतरले आहेत. यापूर्वीच्या अनेक स्पर्धांमध्ये क्रीडा मंडळाना मार्गदर्शक म्हणून ते भूमिका बजावत होते. एकूणच चित्र पाहता एलईडी प्रकरणापासून खो-खोच्या राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत आ. चव्हाण यांनी सर्व सूत्रे हातात घेतली असून ते आता मैदानात उतरल्याचे दिसू लागले आहे.

नगरसेविकांवर संघटनामक कारवाई

आ. चव्हाण  यांनी  एलईडीबाबत भूमिका घेताना, संघटनेला कोणतीही बाधा येणार नाही, त्यासाठी कोणीही कितीही मोठा पदाधिकारी असला तरी त्याची दखल संघटना घेणारच. असा निर्णय घेत एलईडी विषयात सभागृहात गैरहजर राहणार्‍या सेनेच्या ‘त्या’ नगरसेविकांवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. मात्र, कारवाईपूर्वी या संशयास्पद प्रकरणाची सखोल माहिती घेऊन यातील अन्य गुंतवणूकदारांना धडा शिकवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.