Mon, Jun 24, 2019 21:50होमपेज › Konkan › शहीद कुटुंबियांचा चिपळुणात सन्मान

शहीद कुटुंबियांचा चिपळुणात सन्मान

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चिपळूण : विशेष प्रतिनिधी

मुंबईवरील 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर चिपळुणात शहीद दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहिदांच्या कुटुंबियांचा चिपळूणकरांनी कृतज्ञतापूर्वक सन्मान केला तर शहिदांना आदरांजली वाहिली.

शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी झाला. यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री ना. अनंत गीते, एअर मार्शल हेमंत भागवत, आ. सदानंद चव्हाण, आ. सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख सचिन कदम, राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

चिपळूणमध्ये प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम घेण्यात आला. कारगिल, तसेच 26/11 च्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या कुटुंबियांना समारंभपूर्वक गौरविण्यात आले तर एअर मार्शल भागवत व मुंबई दहशतवादी हल्ल्यात बचावलेले दसपटीचे सुपुत्र पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांचाही  यावेळी हृद्य सत्कार करण्यात आला. देशभक्तीपर गीते, सोबत राणा प्रताप तिवारी यांचे सूत्रसंचालन, टाळ्यांचा कडकडाट आणि एकेका व्यक्तीचा होणार सत्कार यामुळे वातावरण भारावून गेले होते.

वीरपत्नी मीराबाई जनार्दन उतेकर, वासंती पांडुरंग कदम, वीरमाता माया शिंदे, वीरपिता मनोहर शिंदे, वीरपत्नी अंजनाबाई अनंतराव शिंदे, वीरपिता धोंडू आंब्रे, वीरपुत्र राकेश कदम, सुधाकर तुकाराम सकपाळ, हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले राजेंद्र गुजर यांचे बंधू तसेच लक्ष्मीबाई शिंदे, पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांचा या निमित्ताने गौरव झाला. यावेळी शिरगाव येथील शहीद संतोष शिंदे यांच्या वडिलांनी आपल्या पुत्राची यशोगाथाच समोर ठेवली.

त्याच्या या वीर गाथेने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले तर मंडणगडचा वीरपुत्र राजेंद्र गुजर यांच्या  सैन्यात कार्यरत असलेल्या बंधूने सत्कार स्वीकारताना ‘आपल्या भावाआधी मी का शहीद झालो नाही’ असा प्रश्‍न थेट व्यासपीठावरून केला. यामुळे सर्वजण भारावून गेले. टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांचा सत्कार झाला तर शहिदांना मानवंदना देण्यात आली. यावेळी एअर मार्शल हेमंत भागवत यांचा नागरी सत्कार झाला. केवळ या कार्यक्रमासाठीच आपण आलो. एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला याबद्दल त्यांनी आभार मानले. कार्यक्रमावेळी ना. गीते यांनी शुभेच्छा दिल्या.