Tue, Apr 23, 2019 13:32होमपेज › Konkan › राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 1 डिसेंबरला आक्रोश मोर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 1 डिसेंबरला आक्रोश मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चिपळूण : खास प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दि. 1 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत.

रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहापासून सकाळी 11 वाजता मोर्चाला प्रारंभ होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी आ. भास्कर जाधव, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, आ. संजय कदम, प्रांतिक सरचिटणीस बाबाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होईल, असे चिपळूण तालुकाध्यक्ष जयेंद्रथ खताते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात यावेळी हल्लाबोल करण्यात येणार आहे. व्यापार्‍यांना जाचक जीएसटी, सर्वसामान्यांना झळ पोहोचलेली नोटाबंदी, फसवी कर्जमुक्ती, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण, चिपळूण-कराड रेल्वेमार्ग कार्यान्वित करणे, महामार्गावरील खड्डे, जिल्हा नियोजनच्या निधीत पन्नास टक्के घट, वाळू व्यावसायिकांचा प्रश्‍न, शिक्षकांचे प्रश्‍न, शासकीय ठेकेदारांच्या समस्या आदी प्रश्‍नांबाबत या मोर्चात शासनाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकार्‍यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चाचे तालुकास्तरावर नियोजन करण्यात आले असून जिल्हाभरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, जि. प. व पं. स. सदस्य, नगरसेवक सहभागी होणार आहेत.

चिपळूण तालुक्याची मोर्चाच्या नियोजनाची बैठक दि. 29 नोव्हेंबर रोजी पागझरी येथील विद्यालयात होणार आहे, अशी माहिती श्री. खताते यांनी दिली. दरम्यान, शासनाविरोधात या आधी सोमवारी काँग्रेसनेदेखील महामार्ग रोको आंदोलन केले.