Thu, Apr 25, 2019 11:56होमपेज › Konkan › नाणार प्रकल्प हे शिवसेनेचेच पाप

नाणार प्रकल्प हे शिवसेनेचेच पाप

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 09 2018 10:57PM

बुकमार्क करा
 चिपळूण : प्रतिनिधी

नाणारची रिफायनरी हे शिवसेनेनेच राजापूरच्या जनतेवर लादलेलं पाप आहे. या पापाची फळं पुढील निवडणुकीत मतदार यांनाचा भोगायला लावणार आहेत. खासदार राऊत यांनी कितीही प्रकल्पाच्या विरोधाच्या टिमक्या वाजविल्या तरी त्यांनीच हा विश्‍वासघात केला आहे, असा घणाघाती आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी ‘पुढारी’शी बोलताना केला. खासदार राऊत यांनी नाणारची रिफायनरी हे आमचे पाप नसून उलटपक्षी भाजपलाच टार्गेट केले. परंतु, माजी खासदार निलेश राणे यांनी विनायक राऊत यांचा खरपूस समाचार घेतला.

सेनेची मंडळी नेहमीच दुतोंडी भूमिका घेतात, असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले की, नाणार प्रकल्पाचे नोटिफिकेशन यांच्याच काळात झाले. आपल्या मतदारसंघात प्रकल्प आणण्यासाठी जमीन उपलब्ध असल्याची बतावणी करून खा. राऊत व अनंत गीते यांनीच या प्रकल्पासाठी आग्रह धरला होता. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकरणी खुलासा केला आहे. परंतु, आता या प्रकल्पाला जनतेचा कडवा विरोध लक्षात आल्यावर आपल्या अंगावर शेकेल म्हणून दुसर्‍यावर ढकल्याचे उद्योग सेनेच्या खासदारांचे आहेत. खासदार राऊत यांची राजकारणात कधीच स्पष्ट भूमिका पहायला मिळालेली नाही, असेही निलेश राणे म्हणाले.

राजापूरच्या जनतेला सेनेवाल्यांनी प्रकल्पाबाबत नेहमीच संभ्रमात ठेवले. खरं काय ते कळूच दिले नाही. स्वत: मात्र या प्रकल्पाकडे फायनान्सर म्हणून पाहात राहायचे, सेटिंग करायच्या व जनतेचा विरोध लक्षात आल्यावर पलटी मारून याच जनतेचा पुन्हा बुद्धीभेद करून आंदोलनाची भाषा करायची. जनतेला पुन्हा प्रकल्पाच्या विरोधासाठी उचकावून निवडणुकांचे राजकारण करायचे. सेनेवाल्यांचे हे उद्योग जैतापूर व जिंदल प्रकल्पापासून येथील जनतेच्या लक्षात आले आहेत. त्यामुळे नाणारची रिफायनरी आपले पाप नाही, हा त्यांचा खुलासा हास्यास्पद असून जनतेला न पटणारा आहे. इथे प्रकल्पाला विरोध करायचा, मुंबईत यांचेच मंत्री भूसंपादनाचे आदेश देतात, हा विरोधाभास नाही का, असा सवाल त्यांनी केला. ‘स्वाभिमान’ची या प्रश्‍नावर स्वच्छ भूमिका आहे. नाणारचा प्रकल्प आम्ही येथून हद्दपार केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही राणे म्हणाले.