Sat, Dec 07, 2019 13:59होमपेज › Konkan › विषय समिती सभापतीपदाच्या निवडीत भाजपचा एकतर्फी विजय

विषय समिती सभापतीपदाच्या निवडीत भाजपचा एकतर्फी विजय

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 8:58PM

बुकमार्क करा
चिपळूण : शहर वार्ताहर

येथील न. प.च्या बुधवारी झालेल्या विषय समिती सभापती निवडणुकीत भाजप सत्ताधारी गटाने निर्विवाद वर्चस्व राखत एकतर्फी विजय मिळविला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी कल्पना जगताप-भोसले यांनी काम पाहिले.

वर्षभरापूर्वी नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून न.प.वर सत्ता मिळविणार्‍या भाजपाने सभागृहात वर्चस्व राहावे म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादी आणि एक अपक्ष यांना सोबत घेत गतवर्षी सर्व समित्या आपल्या ताब्यात ठेवल्या. विषय समिती निवडणुकीसंदर्भात शासनाच्या निकषानुसार या निवडणुका दोन टप्प्यांत झाल्या. पहिल्या टप्प्यात समिती सदस्य संख्या ठरविणे तर दुसर्‍या टप्प्यात सभापती निवड झाली. निवडणूक निकषानुसार सभागृहातील संख्याबळाचा विचार करता सहा ते नऊ  यामधील समिती सदस्य संख्या निश्‍चितीमध्ये सभागृहाने मागील प्रमाणेच प्रत्येक समितीसाठी सात सदस्य ही संख्या अंतिम करण्यात आली. यानुसार सभागृहातील सेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या सभागृहातील तौलनिक  संख्याबळानुसार प्रत्येक समितीमध्ये सेनेकडून 3 सदस्य तर उर्वरित चार सदस्य भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या गटाचे दिले गेले. यातच समिती सभापती निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय झाला.

दुसर्‍या टप्प्यात सभापती निवडणुकीमध्ये सेनेचा पराभव अटळ असल्याने मतदान झाल्यास सेनेचा सभापतीपदाचा उमेदवार पराभूत होणार हे निश्‍चित झाले. परिणामी, या निवडणूक प्रक्रियेत गटनेते शशिकांत मोदी आणि मोहन मिरगल, अपक्ष नगरसेवक राजेश केळस्कर हजर होते तर अन्य सेनेचे नऊ नगरसेवक अनुपस्थित राहिले. त्यामुळे सभापतीपदासाठी मतदानाच्या माध्यमातून ‘वन टू का फोर’ करण्याच्या तयारीत असलेली सेना मागे आली. सभापतीपदासाठी सत्ताधारी गटाकडून सर्वजण बिनविरोध निवडून आले.

यामध्ये काँग्रेसला दोन, यामध्ये बांधकाम समिती सभापतीपदी करामत मिठागरी, शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक सभापतिपदी सफा गोठे, राष्ट्रवादीला दोन समित्यांमध्ये पाणी सभापतीपदी पुन्हा एकदा वर्षा जागुष्ठे यांना तर फैरोजा मोडक यांना आरोग्य सभापतीपद तर अपक्ष नगरसेविका सीमा रानडे यांना महिला-बालकल्याण समिती सभापतिपद देण्यात आले. तसेच तौलनिक संख्याबळानुसार सभागृहात जास्त सदस्यसंख्या असलेल्या सेना, भाजप आणि काँग्रेस यातील प्रत्येकी एक सदस्य शासन निकषांनुसार स्थायी समितीत घेण्यात आला. यामध्ये सेनेकडून शशिकांत मोदी, भाजपकडून नुपूर बाचीम तर काँग्रेसकडून सुधीर शिंदे यांची वर्णी लागली.