Sun, Mar 24, 2019 17:20होमपेज › Konkan › चिपळुणातील जवानाचा अरुणाचल प्रदेशमध्ये मृत्यू

चिपळुणातील जवानाचा अरुणाचल प्रदेशमध्ये मृत्यू

Published On: Jul 04 2018 2:14AM | Last Updated: Jul 03 2018 10:13PMचिपळूण : खास प्रतिनिधी

भारतीय सैन्यदलात अरुणाचल प्रदेशातील रोहिंग जिल्ह्यात चीनच्या सरहद्दीवर सेवा बजावत असताना तालुक्यातील ताम्हणमळा (गवळवाडी) येथील जवान जयेंद्र राजाराम तांबडे (34) यांचा मृत्यू झाला. उंच अशा ठिकाणी प्राणवायू कमी पडल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्ये 2 जुलै रोजी सकाळी 8.30 वा. त्यांचे निधन झाले. यामुळे तांबडे कुटुंबीयांना धक्‍का बसला आहे.

रोहिंग जिल्ह्यात पायोनियर कंपनीमध्ये जयेंद्र तांबडे शिपाई म्हणून कार्यरत होते. कर्तव्यावर असताना त्यांना अचानक श्‍वसनाचा त्रास जाणवू लागला आणि ऑक्सिजनची कमतरता भासून हृदयविकाराचा झटका आला. तातडीने त्यांना मोटारीने अरुणाचल प्रदेशातील  लष्करी इस्पितळात नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. 2008 मध्ये ते सैन्यात भरती झाले होते. त्यांचे दोन चुलत बंधूही सैन्यात आहेत. अवघ्या 34 व्या वयाच्या जवानाचा अकाली मृत्यू झाल्याने तांबडे कुटुंबियांना धक्‍का बसला आहे. त्यांच्या पश्‍चात ताम्हणमळा येथे शेती करणारे आई-वडील तर पत्नी दोन लहान मुलांसह चिपळूणमध्ये वास्तव्यास आहे. दोन भाऊ मुंबईमध्ये कामाला आहेत. सैन्यामध्ये असलेले त्यांचे चुलत भाऊ प्रवीण तांबडे सुट्टीनिमित्त नुकतेच गावाला आले आहेत. ही वार्ता समजल्यावर ते मृतदेह ताब्यात घेण्यासाठी मुंबईला गेले आहेत. 

हवामान खराब असल्याने अरुणाचल प्रदेशमधून त्यांचा मृतदेह आणण्यास उशीर झाला. रोहिंग येथील दिब्रुगढ, त्यानंतर कोलकाता येथून विमानाने मुंबई येथे त्यांचा मृतदेह आणण्यात आला. मंगळवारी सायंकाळी उशिराने ताम्हणमळा येथे त्यांचे पार्थिव आणले जाणार आहे. बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी मानवंदना देऊन शासनातर्फे पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे.