Tue, Jul 16, 2019 00:24होमपेज › Konkan › प्रधानमंत्री आवास योजनेत चिपळूण प्रथम

प्रधानमंत्री आवास योजनेत चिपळूण प्रथम

Published On: Aug 27 2018 10:15PM | Last Updated: Aug 27 2018 9:35PMचिपळूण : खास प्रतिनिधी

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील उकृष्ट कामगिरीमुळे जिल्ह्यातून चिपळूण तालुक्याची निवड करण्यात आली आहे. घरकुलांचे वेळेत बांधकाम पूर्ण करणे व कामाचे  नियोजन  यामध्ये येथील पं. स.ने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल 1 सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी सरिता पवार यांचा बेलापूर येथे शासनातर्फे गौरव होणार आहे.

दारिद्—यरेषेखालील तसेच आर्थिकद‍ृष्ट्या कमकुवत असलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबास प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. घरकुलासाठी सुमारे सव्वा लाखांचे अनुदान दिले जाते. सन 2016-17 मध्ये चिपळूण तालुक्यास 288 घरकुलांना मंजुरी मिळाली. यातील 267 घरे वेळेत पूर्णत्वास गेली. तर 2017-18 मध्ये 34 घरकुलांना मंजुरी मिळाली असता 26 घरकुले पूर्ण झाली आहेत.  चिपळूण तालुक्याने 16-17 मध्ये 89 टक्के तर 17-18 मध्ये 76 टक्के घरकुलांचे काम पूर्ण केले. या योजनेत प्रथम ठाणे जिल्हा, द्वितीय नाशिक तर सातारा जिल्ह्यास तृतीय क्रमांक मिळाला आहे.

शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात उत्कृष्ट कामकाज करणार्‍या एका तालुक्याचीही निवड करण्यात आली. यामध्ये चिपळूण तालुक्याची निवड झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुले मंजूर झाले तरी लाभार्थ्यांच्या विविध अडचणी असतात. गटविकास अधिकारी सरिता पवार यांनी ग्रामसेवक, संबंधित गावचे सरपंच, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पंचायत समित्यांचे विस्तार अधिकारी व संबंधित लाभार्थ्यांना विश्‍वासात घेतले आणि घरकुलांचे बांधकाम वेळेत पूर्ण होण्यात मदत झाली.  ग्रामविकास विभागाच्या सचिवांच्या हस्ते निवड झालेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक व गटविकास अधिकार्‍यांचा  गौरव केला जाणार आहे.