होमपेज › Konkan › काँग्रेसचा भाजपविरोधात हल्लाबोल

काँग्रेसचा भाजपविरोधात हल्लाबोल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चिपळूण /रत्नागिरी : शहर वार्ताहर

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती व चौपदरीकरण, चिपळूण-कराड रेल्वे मार्ग, गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग चिपळूण शहराबाहेरून न्यावा, आदी मागण्यांसाठी शहरातील बहादूरशेख चौकात सोमवारी सकाळी खा. हुसेन दलवाई व माजी आ. रमेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला.  चिपळूणबरोबरच काँग्रेस कार्यकर्त्यांनी संगमेश्‍वर, हातखंबा, लांजा तसेच राजापुरातही भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करीत रास्ता रोको केला.

दरम्यान, संगमेश्‍वरात आंदोलनकर्त्यांपेक्षा पोलिसच अधिक असल्याने तेथील आंदोलनाचा बार फुसका ठरल्याची चर्चा सुरू  ती. चिपळुणातील शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी सकाळी 11.30 च्या सुमारास महामार्ग रोको आंदोलन केले. सुमारे अर्धा तास महामार्ग रोखून धरल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबलचक  रांगा लागल्या होत्या. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास  खा. दलवाई आणि कदम या दोन  नेत्यांनी आंदोलनस्थळी अचानक  प्रवेश  केला. 

• घोषणांनी परिसर दणाणला

येथील बहादूर शेख नाक्यावर सरकारविरोधात आंदोलन करणार्‍या  खा. दलवाई, माजी रमेश कदम यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह 51 जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. यावेळी आंदोलकांनी बहादूर शेख नाका परिसर विविध घोषणांनी अक्षरश: दणाणून सोडला. 

बहादूर शेख नाका या ठिकाणी दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते जमा झाल्यानंतर खा. दलवाई व कदम यांनी महामार्गालगत घोषणाबाजी केली. पंधरा-वीस मिनिटांच्या घोषणाबाजीनंतर दलवाई व कदम यांनी अचानक महामार्गाच्या मधोमध ठाण मांडले. सुमारे अर्धा-पाऊण तास भाजप सरकारविरोधात घोषणांच्या माध्यमातून हल्लाबोल केला.  महामार्गाचे चौपदरीकरण तातडीने मार्गी लावावे. महामार्गावरील खड्डे बुजवावेत. चिपळूण-कराड रेल्वे मार्ग झाला पाहिजे. गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग शहराबाहेर न्या, अशा विविध मागण्यांच्या घोषणा देत सरकार विरोधात हल्लाबोल करण्यात आला. महामार्ग रोखल्याने अर्धा तास वाहतूक ठप्प झाली. अर्ध्या तासानंतर पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. कायदा व सुव्यवस्थेसाठी कार्यवाही करून सर्वांना सोडून देण्यात आले. 

या आंदोलनात श्रीकृष्ण खेडेकर, संजय तांबडे, नंदू थरवळ, बाबा लाड, सुधीर दाभोळकर, इब्राहिम दलवाई, दादा बैकर, संदीप लवेकर, सुरेश पाथरे, भरत लब्धे, लियाकत शाह, शाहनवाज शाह, कैसर देसाई, विजय गांधी, राकेश दाते तसेच कार्यकर्ते व महिलांनी सहभाग घेतला. रत्नागिरी तालुक्यात हातखंबा येथे झालेल्या आंदोलनाचे नेतृत्त्व दीपक राऊत, श्रीमती सावंत, अल्पसंख्याक सेलचे हारीस शेकासन, अश्‍विनी आगाशे,  कपिल नागवेकर आदींनी केले.