Mon, Jun 17, 2019 02:59होमपेज › Konkan › विषय समितीत ‘वन टू का फोर’?

विषय समितीत ‘वन टू का फोर’?

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 20 2017 10:11PM

बुकमार्क करा

चिपळूण : शहर वार्ताहर

चिपळूण न.प.च्या दि. 27 रोजी होणार्‍या विषय समिती निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांकडून ‘वन टू का फोर’ करण्याच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. यावेळी एलईडी प्रकरणात तोंडघशी पडलेली शिवसेना समिती ताब्यात घेण्यासाठी पुढे सरसावली आहे, तर सत्ताधारी समित्या राखण्यासाठी राजकीय खेळीचा अवलंब करत आहे.

बुधवार दि. 27 रोजी विषय समिती निवडणूक होत आहेत. न. प. त शिवसेनेची सदस्य संख्या सर्वाधिक आहे. सेनेचे एकूण अकरा सदस्य आहेत. समित्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीने सेनेला हा जादुई आकडा यश मिळवून देऊ शकतो. सत्ताधारी भाजप गटाकडे पंधरा सदस्य आहेत. त्यामध्ये  भाजपच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व समित्या स्वत:कडे ठेवण्याचे राजकीय कसब आजमावले जात आहे.

काँग्रेसचे पाच नगरसेवक, राष्ट्रवादीचे चार व एक अपक्ष नगरसेवक, तर नगराध्यक्षांसह भाजपचे पाच असे एकत्रित पंधरा सदस्यांमुळे भाजपला समिती सभापतीपदे ताब्यात घेण्यास यश मिळू शकते. मात्र, एलईडी प्रकरणानंतर सावध झालेल्या शिवसेनेने या निवडणुकीत ‘वन’ ‘टू’ का ‘फोर’ करून समिती सभापतिपदे ताब्यात घेण्याची चाल खेळली जात आहे.

दोन्ही गोटातून मिळालेल्या अंतर्गत माहितीनुसार, भाजपकडून समिती सभापतिपदाच्या वाटणीत राष्ट्रवादीला एक, काँग्रेसला दोन, तर भाजपकडे तीन पदांसाठी उमेदवार दिले जाणार असल्याचे समजते. शिवसेनेकडून दोन व सेनेला वन टू का फोरच्या माध्यमातून मदत करणार्‍या अन्य नगरसेवकांसाठी तीन सभापतिपदे देऊन समितींवर सेनेचे वर्चस्व ठेवण्याची राजकीय खेळी करण्यात येत असल्याचे समजते.

सेना-भाजपमध्ये चुरस

चिपळुणात सध्या सेना-भाजपमध्ये चुरस सुरू आहे. एलईडी प्रकरणावरून जनतेत झालेली अवहेलना थांबविण्याचे प्रयत्न सेनेकडून होणार आहेत. या माध्यमातून भाजपला तोडीस तोड उत्तर देण्याची व्यूहरचना आखली जात आहे.