Thu, Jul 18, 2019 04:05होमपेज › Konkan › एलईडी’ विरोधातील ठराव फेटाळला

एलईडी’ विरोधातील ठराव फेटाळला

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 16 2017 8:27PM

बुकमार्क करा

चिपळूण : शहर वार्ताहर

वादग्रस्त ‘एलईडी’ संदर्भात विशेष सभेची मागणी करणार्‍या विरोधक शिवसेनेची राजकीय चाल उधळून लावत सत्ताधारी भाजप गटाने या विषयावर विरोधकांनी मांडलेला ठराव बहुमताने फेटाळून लावला. यामुळे शिवसेनेने केलेली चाल त्यांच्याच अंगलट आली. अकरा विरुद्ध बारा मतांनी हा ठराव फेटाळण्यात आला.

या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे होत्या.  शिवसेना नगरसेवकांसह अन्य काही नगरसेवकांनी या विषयासंदर्भात विशेष सभेची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवार दि. 15 रोजी सायंकाळी 4 वा. सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला सुरुवात होताच सेना नगरसेवक मोहन मिरगल यांनी तांत्रिक सल्लागाराची नेमणूक न.प.ने कोणत्या आधारे केली, हा विषय सभागृहासमोर आला होता का, याला सभागृहाची मान्यता होती का? असे काही मुद्दे उपस्थित केले. या विषयावर सुमारे अर्धा तास सभागृहात सत्ताधारी व विरोधकांत ‘तूतू-मैंमैं’ सुरू होती. सत्ताधार्‍यांकडून विजय चितळे यांनी बाजू मांडताना आठ महिन्यांपूर्वी या निविदेला मंजुरी मिळाली. त्यानंतर काम सुरू झाले. मात्र, सत्ताधार्‍यांकडून हे मुद्दे आत्ताच का उपस्थित केले जात आहेत, असे मत मांडण्यात आले. 

दरम्यान, सेना नगरसेविका स्वाती दांडेकर यांनी या वादातच ‘एलईडी’ विषयात दिलेल्या बिलामध्ये महिलांनाही वाटा मिळाला, असे आरोप अपक्ष नगरसेवक केळसकर यांनी केल्याचे सांगत हा महिलांचा अवमान आहे. याबाबत अध्यक्षांनी दखल घ्यावी. मी याचा निषेध म्हणून सभात्याग करीत आहे, असे म्हणणे मांडताच सभागृहाचा नूर पालटला. 

त्यानंतर पुन्हा मूळ विषयावर सभागृहात चर्चेला सुरुवात झाली. वादाचा पारा कमी होताच पीठासीन अधिकार्‍यांनी ठराव उपसूचना मांडण्याची सूचना केली. अध्यक्षांच्या सूचनेनुसार उपसूचनेतील मिरगल यांचे नाव वगळून खातू यांनी उपसूचना मांडली. ठराव व उपसूचना मतदानात टाकल्यावर ती ठरावाच्या बाजूने अकरा, तर उपसूचनेच्या बाजूने बारा असे मतदान होऊन ठराव फेटाळला. सेनेने राजकीय डावपेच आखून यशस्वी होण्यासाठी केलेली खेळी सत्ताधारी भाजपने त्यांच्यावरच उलटवली. सेना नगरसेविका स्वाती दांडेकर यांनी सभात्याग केल्यानंतर नगरसेवक मिरगल यांनी सभागृहातच ‘सर्व मॅनेज झाले आहे’ असा टोमणा मारला. चर्चेनुसार, कासेकर यांची अनुपस्थिती, दांडेकर यांचा सभात्याग व शिवसेनेची राजकीय चाल सर्वच मॅनेज असल्याचे बोलले जात होते.

मतदानात सेना ‘ बॅक फूटवर’

ठराव मंजूर होण्यासाठी शिवसेनासहीत विरोधकांकडून गेले दोन दिवस राजकीय डावपेचांची आखणी सुरू होती. त्यानुसार सत्ताधार्‍यांकडून उपनगराध्यक्ष भोजने अनुपस्थित असल्याचा फायदा घेण्यात येणार होता. तसेच राष्ट्रवादीची मते सेनेने आपल्याकडे वळवण्याची खेळी झाली होती. मात्र, प्रत्यक्षात सेनेच्या नगरसेविका सुषमा कासेकर या गैरहजर होत्या, तर दांडेकर यांनी सभात्याग केला. राष्ट्रवादीच्या फैरोजा मोडक यांनी सेनेच्या बाजूने तर बिलाल पालकर व शिवानी पवार यांनी सत्ताधार्‍यांच्या बाजूने मतदान करून राष्ट्रवादीला झटका दिला.