Tue, Jul 23, 2019 18:47होमपेज › Konkan › चिपळूण सीईओंना सेनेचा निर्वाणीचा इशारा

चिपळूण सीईओंना सेनेचा निर्वाणीचा इशारा

Published On: Mar 25 2018 12:36AM | Last Updated: Mar 25 2018 12:36AMचिपळूण : शहर वार्ताहर

विविध तक्रारींवरून दोषी सिद्ध झालेले न.प.चे वादग्रस्त मुख्याधिकारी (सीईओ) डॉ. पंकज पाटील यांनी दोन दिवसांत आपला बाडबिस्तारा चिपळुणातून गुंडाळावा; अन्यथा त्यांना शिवसेना स्टाईलने चिपळूणच्या बाहेर काढले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. 58 (2) अधिनियमाचा गैरवापर केल्याबद्दल दोषी ठरलेल्या नगराध्यक्षांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख व माजी नगरसेवक राजू देवळेकर यांनी केली.

पत्रकार परिषदेला न. प. गटनेत्या जयश्री चितळे, नगरसेविका सई चव्हाण, संजीवनी घेवडेकर, स्वाती दांडेकर, नगरसेवक उमेश सकपाळ, विकी नरळकर, शशिकांत मोदी आदी उपस्थित होते. अधिक माहिती देताना देवळेकर यांनी सांगितले की, भुयारी गटारी योजनेचा ‘डीपीआर’ काढण्यासाठी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी 58(2) या न. प. अधिनियमातील विशेष अधिकाराचा वापर केला. त्याबाबत सेनेने जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली. त्यावरील सुनावणीअंती जिल्हाधिकारी यांनी निर्णय व आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधित दोघेही दोषी असल्याचे निकालात स्पष्ट केले आहे. तसेच दिलेल्या आदेशानुसार संबंधितांना बेकायदेशीर अधिकार वापराबाबत जबाबदार धरून नियमानुसार शासनाकडे कारवाईचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी योग्य व न्यायपूर्ण निकाल दिला आहे.

सार्वत्रिक निवडणुकीत ज्या भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादीवर आरोप करून सत्ता मिळविली त्याच भाजपने राष्ट्रवादी व काँग्रेसला जवळ करून भ्रष्टाचार सुरू केला आहे. न.प.त मोठे प्रकल्प राबवण्याचे नियोजन करायचे. त्या नियोजनासाठी न. प. फंडातील कोट्यवधीची रक्‍कम प्राथमिक नियोजनासाठी वापरायची, त्यातून टक्केवारी घ्यायची हा उद्योग सध्या सत्ताधार्‍यांनी सुरू केला आहे. मुख्याधिकारी चुकीचे मार्गदर्शन करतात. त्यातूनच आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी मदत करतात, असा आरोपही यावेळी करण्यात आला.

भुयारी गटारासाठी 58(2) चा विशेष अधिकार वापरा, असा सल्ला भाजप नेते व स्वीकृत नगरसेवकांनी नगराध्यक्षांना दिला. सल्ला देताना या माध्यमातून पक्षाला चांगला आर्थिक लाभ होईल, असे सांगितल्याचा आरोप देवळेकर यांनी केला. शिवसेनेने अन्य केलेल्या तक्रारींचा निकालही लवकरच मिळेल. त्यामध्ये एलईडीसह अन्य महत्त्वाच्या विकासकामांमधील गैरव्यवहारबाबत पुराव्यानिशी तक्रारी केल्या आहेत. त्याची सुनावणी झाली आहे. याचाही निकाल अपेक्षित लागेल, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

अडीच कोटी हडपण्याचा डाव : मुकादम

माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी न. प. अधिनियम 58(2) चा गैरवापर केल्यासंदर्भात 8 फेब्रुवारी 2017 रोजी प्रथम तक्रार केली. त्या नंतर तब्बल महिन्यांनी 9 मार्च 2017 रोजी शिवसेना गटनेते मोदी यांनी त्याच स्वरूपाची तक्रार केली. संबंधितांचा 58(2) च्या माध्यमातून सुमारे अडीच कोटी रूपये हडप करण्याचा डाव  होता, असा आरोप मुकादम यांनी केला. 

 

Tags : Chiplun, Chiplun news, Chiplun Nagar Panchayat, CEO, Complaints,