Thu, Apr 25, 2019 03:27होमपेज › Konkan › चिपळूण-कराड रेल्वे ‘ट्रॅक’वर

चिपळूण-कराड रेल्वे ‘ट्रॅक’वर

Published On: Feb 10 2018 1:32AM | Last Updated: Feb 09 2018 10:53PMचिपळूण : समीर जाधव

शापुर्जी-पालोजी कंपनीने चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचा ठेका नाकारल्यानंतर या मार्गाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु, केंद्र सरकारने अर्थसंकल्पात चिपळूण-कराड रेल्वे मार्गासाठी पहिल्या टप्प्यात 366.5 कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. त्यामुळे चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचे काम सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

भारतीय मध्य रेल्वेकडे चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचे काम आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सर्वप्रथम या मार्गाला मंजुरी दिली. आता त्या पुढच्या टप्प्यासाठी 366.5 कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गावर दाटलेले काळे ढग आता दूर झाले आहेत. लवकरच या मार्गाचे काम सुरू होणार आहे. 120 कि.मी.च्या या मार्गासाठी 1,200 कोटी रुपयांची गरज आहे. 

राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारने त्यासाठी शासनाकडून आवश्यक ती तरतूद केली आहे. यानंतर या मार्गाचे काम शापुर्जी-पालोजी कंपनीला देण्यात आले. मात्र, मध्यंतरी संबंधित कंपनीने या कामाचा ठेका रद्द केला. त्यामुळे चिपळूण-कराड रेल्वेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या अनुषंगाने चिपळूण व कराड परिसरातील जनतेने उठाव केला. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केंद्र शासनाकडे निवेदने दिली. 

फत्यामुळे अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद झाली आहे. चिपळूण ते कराड  मार्ग प्रवासी वाहतुकीबरोबरच माल वाहतुकीसाठी  फायद्याचा आहे. हा मार्ग 90 गावांतून जाणार असून 19 बोगदे असणार आहेत. कुंभार्ली घाटामध्ये सर्वात मोठा बोगदा असणार असून कोकण रेल्वे मार्गावरील करबुडे बोगद्यापेक्षा तो मोठा असणार आहे. 

याचा फायदा मोठ्या प्रमाणात माल वाहतुकीसाठी होणार आहे. चिपळूणपासून पुढे कोकण रेल्वे बंदराला जोडली जात आहे. त्यामुळे हा मार्ग भविष्याच्या द‍ृष्टीने फायद्याचा ठरणार आहे.

कोकण-पश्‍चिम महाराष्ट्र जोडला जाणार

या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे मध्य रेल्वे कोकण रेल्वेला जोडली जाणार आहे. कराडच्या पुढे कोणती अडचण आल्यास मध्य रेल्वेच्या गाड्या कोकण रेल्वे मार्गावर वळविता येतील, तर गोव्याकडे जाताना चिपळूणच्या पुढे कोणतीही अडचण आल्यास कोकण रेल्वेच्या गाड्या कराडमार्गे मध्य रेल्वेवर वळविता येतील. हा महत्त्वाचा फायदा असणार आहे. शिवाय कोकण व पश्‍चिम महाराष्ट्र रेल्वेने जोडला जाणार आहे.