Mon, Jun 24, 2019 16:43होमपेज › Konkan › शंभर कोटी आणल्यास हत्तीवरून मिरवणूक काढू

शंभर कोटी आणल्यास हत्तीवरून मिरवणूक काढू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चिपळूण : शहर वार्ताहर

शहराच्या भुयारी गटार योजनेसाठी मुख्यमंत्र्यांकडून शंभर कोटी रूपये आणू, असे सांगणार्‍या सत्ताधारी गटातील ज्येष्ठ नगरसेवकांनी हा निधी आणल्यास त्यांची आम्ही चिपळुणात हत्तीवरून मिरवणूक काढू, अशी उपरोधिक टिप्पणी चिपळूण शहर सुधार समिती अध्यक्ष व माजी नगरसेवक शिरीष काटकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला माजी उपनगराध्यक्ष बाळा कदम, महंमद फकीर, लियाकत शाह, माजी बांधकाम सभापती बरकत वांगडे, अपक्ष नगरसेवक अविनाश केळसकर, रामदास सावंत, सेना शहरप्रमुख राजू देवळेकर, माजी नगरसेवक संजय तांबडे, ‘आरपीआय’चे राजू जाधव, अविनाश हरधारे, माजी नगरसेवक इनायत मुकादम आदी होते.

यावेळी काटकर यांनी समितीच्या वतीने सांगितले की, शहर सुधार समिती स्थापन झाल्यानंतर चिपळूण न. प. कारभाराविरोधात व वादग्रस्त मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्याविरोधात भुयारी गटार, एलईडी, बाजारपूल आदी कोट्यवधी रुपयांच्या कामातील गैरव्यवहाराबाबत तक्रारी करण्यात आल्या. या संदर्भात समितीच्या माध्यमातून न.प.कडे माहिती अधिकारात कागदपत्रे मागितली. मात्र, आजपर्यंत न.प.ने ही कागदपत्रे दिली नाहीत. मात्र, सततच्या पाठपुराव्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या प्रत्यक्ष भेटीनंतर न.प.मध्ये जिल्हा प्रशासनाने दोनवेळा चौकशी समिती पाठवली.

या चौकशी समितीच्या अहवालात मुख्याधिकारी व भुयारी गटार संदर्भातील तक्रारीनुसार गैरव्यवहार स्पष्ट झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी न्याय व निर्णय नुकताच दिला आहे.  मुख्याधिकार्‍यांवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या निर्णयाची जिल्हा प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करावी. तसेच आर्थिक गैरव्यवहारातील रकमेची वसुलीही तातडीने करावी. हा पैसा जनतेचा  आहे. ज्या मुख्याधिकार्‍यांविरोधात सभागृहाने सर्वानुमते कारवाईचा ठराव केला, तो दोन महिने स्वत:कडे ठेवला गेला. मुख्याधिकार्‍यांच्या दहशतीपुढे सत्ताधारी नगरसेवकांचे काहीही चालत नाही. वर्षभरात एकाही सत्ताधारी नगरसेवकाने त्यांच्याविरोधात आवाज उठविला नाही, ही शोकांतिका असल्याचे सांगण्यात आले.
 

 

 

tags ; Chiplun,news,City's,underground, drainage, scheme, One, hundred, crores, Funds,


  •