Tue, Mar 19, 2019 03:12होमपेज › Konkan › पोफळीतील आकुस खॉ दर्गा ट्रस्टची चौकशी

पोफळीतील आकुस खॉ दर्गा ट्रस्टची चौकशी

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 10:27PMचिपळूण : प्रतिनिधी 

तालुक्यातील पोफळी येथील हजरत पीर अबुजाफर ऊर्फ आकुस खॉ बाबा यांच्या दर्गा ट्रस्टमध्ये अनियमिता असल्यामुळे या ट्रस्टविरोधात औरगांबाद येथील वक्फ बोर्डने चौकशीचे आदेश दिले आहे. वक्फ बोर्डच्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांनी नुकत्याच झालेल्या उर्साच्या जमा-खर्चाची तपासणी केली. 7 फेब्रुवारीला वक्फ बोर्डतर्फे ते अधिकारी न्यायालयाकडे अहवाल सादर करणार आहेत, अशी माहिती अब्बास इसा सय्यद यांनी पत्रकारांना दिली.
अब्बास सय्यद यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, दर्गा ट्रस्टमध्ये अनियमिता असल्याची तक्रार सय्यद यांनी 16 जानेवारी 2016 ला केली होती. या तक्रारीमध्ये ट्रस्टचे दोन संचालक व गावातील इतर 8 व्यक्‍तींवर फौजदारी दाखल करण्याचीही मागणी केली होती. ट्रस्टची 15 वर्षे निवडणूक झाली नाही.

भाविकांकडून मिळणार्‍या देणगीचा गेली 20 वर्षे हिशोब ठेवला नाही. ट्रस्टच्या नावाने कोणत्याही बँकेत खाते नाही. काहींनी स्वतः आणि आपल्या नातेवाईकाच्या नावावर ट्रस्टचे पैसे बँकेत ठेवले आहे. खोटी बुके छापून बोगस पावत्यांद्वारे देणगी गोळा केली जाते. वक्फ बोर्डने 6 महिने दुर्लक्ष केल्यामुळे अब्बास सय्यद यांनी वक्फबोर्डलाही पार्टी बनवून वक्फ बोर्ड टर्मिनल न्यायालय औरंगाबाद यांच्याकडे दाद मागितली. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना यांना चौकशीचे आदेश दिले. प्रादेशिक वक्फ अधिकारी कोकण विभाग यांना दर्गा ट्रस्टमध्ये अनियमितता आढळून आल्यामुळे त्यांनी 28 सप्टेंबर 2016 ला दर्गा ट्रस्टच्या चौकशीचा मागणी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला. वक्फ बोर्डने उस्मान ईसा सय्यद, अब्दल्ला अली सय्यद, अब्दल्ला हुसैन सय्यद, हशमत दाऊद खान यांना वकीलासहित हजर होऊन आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले. यातील एकही व्यक्‍ती बोर्डकडे हजर झाला नाही. 

2016 मध्ये झालेल्या उर्सचा जमा खर्च टर्मिनल न्यायालयाने सादर करण्याचे आदेश दिले. वर्ष उलटून गेले तरीही संबंधितांनी अहवाल सादर केला नाही. याकडे सय्यद यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयाने 13 डिसेंबर 2017 ला मागील उर्साचा जमा-खर्च सादर करण्याची संबंधितांना पुन्हा संधी दिली. ट्रस्टकडून 12 जानेवारी 2017 ला पाच वर्षांचा ऑडिट रिपोर्ट सादर झाला. यातील तांत्रिक त्रुटींवर अब्बास सय्यद यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. हे सर्व पाहून 24 जानेवारी 2018 ला वक्फ बोर्डने मागील पाच वर्षाच्या उर्साचा हिशोब स्वतंत्रपणे सादर करण्याची सूचना केली. तसेच 1 फेब्रुवारी 2018 च्या उर्साचा हिशोबही सादर करण्याचे आदेश दिले. वक्फ बोर्डने मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दर्गा ट्रस्टची चौकशीचे आदेश दिले. चौकशी अहवाल तयार करण्यासाठी औरंगाबाद येथील प्रादेशिक वक्फ अधिकारी खुसरोह खान, कोकण विभागाचे प्रादेशिक वक्फ अधिकारी अ. जब्बार शेख यांची नियुक्ती केली. त्यांनी उर्सच्या जमा-खर्चाची चौकशी केल्याचे सय्यद यांनी सांगितले.