Tue, Mar 26, 2019 22:08होमपेज › Konkan › ...तर चिपळुणातील ७६ नादुरूस्त शाळा स्थलांतरित करणार काय?

...तर चिपळुणातील ७६ नादुरूस्त शाळा स्थलांतरित करणार काय?

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 12 2017 11:50PM

बुकमार्क करा

चिपळूण : खास प्रतिनिधी

चिपळूण तालुक्यात तब्बल 76 प्राथमिक शाळा मोडकळीस आल्या आहेत. यातील अनेक शाळांच्या छपरांना बांबूचा आधार द्यावा लागत आहे. असे असताना जि. प. स्थायी समिती केवळ चिपळूण शहरातीलच जीवन विद्यामंदिर इमारतीच्या मागे का लागली आहे, असा परखड सवाल येथील सभापती पूजा निकम यांनी उपस्थित केला आहे. याचवेळी त्यांनी स्थायी समिती सदस्यांनी स्थानिक पंचायत समितीला या दौर्‍यात का विश्‍वासात घेतले नाही, असा प्रश्‍न केला आहे. जि. प.च्या अध्यक्षा स्नेहा सावंत व स्थायी समितीने सोमवारी चिपळुणात येऊन चिंचनाका येथील प्राथमिक मराठी शाळा नं. 1 च्या इमारतीची पाहणी केली. प्रथमदर्शनी शाळा चांगली असल्याचे अध्यक्षांनी नमूद केले. मात्र, या दौर्‍याबाबत पं. स. सभापती निकम यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. 

चिंचनाका येथील शाळा पाहण्यासाठी स्थायी समितीने सोमवारचा अख्खा दिवस खर्ची घातला. या शाळेच्या स्थलांतराच्या मुद्यावरून स्थायी समिती या एकाच शाळेवर का लक्ष ठेवून आहे? तालुक्यात 76 तर जिल्हाभरात शेकडो शाळा डबघाईला आल्या आहेत. असे असताना केवळ याच शाळेची तातडीने दखल का घेण्यात आली, असा सवाल सभापती निकम व पं. स. सदस्य नितीन ठसाळे यांनी व्यक्त 
केला. या दौर्‍यात पं. स.ला अंधारात ठेवण्यात आले. याबाबत सभापती निकम म्हणाल्या, अनेक नादुरूस्ती शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसणेही मुश्कील आहे. शाळांच्या छप्परांना बांबूचे आधार देण्यात आले आहेत. काही शाळा खासगी शाळेत सुरू आहेत. जि. प. कडे अशा शाळा दुरूस्तींचे प्रस्ताव लाल फितीत पडून  आहेत. या प्रस्तावावरील धूळ झाडण्यासही कोणाला वेळ नाही. परंतु एका शाळेच्या पाहणीसाठी अख्खी स्थायी समिती चिपळुणात दाखल होते याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.  या शाळेचे स्थलांतर करण्याची गरज नाही. जर स्थलांतराचा निर्णय स्थायी समितीने घेतला तर जिल्ह्यासह चिपळूण तालुक्यातील 76 शाळा स्थलांतरित करणार काय, असा सवाल सौ. निकम यांनी केला 
आहे.