Tue, Jun 18, 2019 22:25होमपेज › Konkan › चिपी विमानतळ गणेश चतुर्थीपर्यंत सुरू होणार

चिपी विमानतळ गणेश चतुर्थीपर्यंत सुरू होणार

Published On: Jun 25 2018 1:47AM | Last Updated: Jun 24 2018 9:50PMकुडाळ : शहर वार्ताहर

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात चिपी विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाची भर पडत आहे. चिपी विमानतळाचे बांधकाम पूर्ण होत आले असून गणेश चतुर्थी पर्यंत हे विमानतळ सुरू होईल. या विमानतळाचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला व्हावा यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच आंदुर्ले गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असून गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांनी  आंदुर्लेवासीयांना दिली.

आंदुर्ले सरपंच,  ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थांनी रविवारी शिवसेना खा. विनायक राऊत व जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत शिवबंधन हाती बांधले. हा पक्षप्रवेश कार्यक्रम आंदुर्ले - कापडोस येथील गुरूकृपा  हॉलमध्ये पार पडला. याप्रसंगी खा.राऊत बोलत होते.  शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, जि.प.सदस्य संजय पडते, नागेंद्र परब, वर्षा कुडाळकर, सभापती राजन जाधव, उपसभापती सौ.श्रेया परब, महिला आघाडी प्रमुख सौ.जान्हवी सावंत, पं.स.सदस्य डॉ. सुबोध माधव, सौ.अनघा तेंडोलकर, माजी सभापती चंद्रकांत माधव, माजी उपसभापती बबन बोभाटे, माजी पं.स.सदस्य अतुल बंगे, नगरसेवक सचिन काळप, माड्याचीवाडी सरपंच सौ.शीतल परब, पाट सरपंच सौ.रिती राऊळ, उपतालुकाप्रमुख संदीप राऊळ, विभाग प्रमुख संदेश प्रभू, शाखाप्रमुख वसंत कोनकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख सुशील चिंदरकर, महेश वेळकर आदींसह पदाधिकारी - कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

प.पू.संत नामदेव महाराज ग्रामविकास आघाडी पुरस्कृत थेट सरपंचपदी निवडून आलेल्या सरपंच सौ.पूजा सर्वेकर, माजी सरपंच तथा ग्रा.पं.सदस्य संतोष पाटील, सौ.अस्मिता भाईप, उज्ज्वला परब, रश्मी तोरसकर, भालचंद्र (बाळा) मोर्ये यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी यावेळी खा. राऊत व आ.नाईक यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधत शिवसेनेत प्रवेश केला.  खा.राऊत म्हणाले,   चिपी विमानतळ सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात पर्यटकांचीही संख्या वाढणार आहे. पाट तलावाचेही सुशोभिकरण केले जाणार आहे. आंदुर्ले गावातील सर्व समस्या मार्गी लावून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू.  गावात गणेश चतुर्थी पूर्वी  मोबाईल नेटवर्क सेवा सुरू केली जाईल, क्वायर बोर्डाचे केंद्र सुरू करून जनतेला रोजगार देण्यासाठी प्रयत्न केले जातील.  सरपंच  व ग्रामस्थांनी ज्या भावनेने शिवबंधन हाती बांधले ती भावना शिवसेना कधीही डावलणार नाही. 

शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्यासाठी तयारीला लागूया : आ.नाईक

आ.वैभव नाईक म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांनी आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढून शिवसेनेचा मुख्यमंत्री विधानसभेवर बसवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्यासाठी आतापासूनच सर्वांनी तयारीला लागूया, असे आवाहन त्यांनी केले. गावच्या विकासाच्या उद्देशाने सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही. प्रत्येकाला शिवसेनेत मान सन्मान दिला जाईल. जि.प.सदस्य संजय पडते, शाखाप्रमुख वसंत कोनकर, बाळा मोर्ये यांनी मनोगत व्यक्‍त केले. सरपंच सौ.सर्वेकर व ग्रा.पं.सदस्य श्री.पाटील यांनी गावाचा पूर्वीपेक्षा दुप्पटीने विकास होऊन गाव विकासाचे स्वप्न पूर्ण व्हावे आणि आंदुर्ले गाव सुजलाम सुफलाम बनावा यासाठी आपण शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे सांगितले.   आभार  विभाग प्रमुख संदेश प्रभू यांनी मानले.